आयएमए घोटाळ्याचा सूत्रधार दिल्लीत गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:23 AM2019-07-20T04:23:07+5:302019-07-20T04:23:17+5:30
मागील दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला आयएमए जेवेल्सचा मालक मो. मन्सूर खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली विमानतळावर बेड्या ठोकल्या.
बंगळुरू : मागील दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला आयएमए जेवेल्सचा मालक मो. मन्सूर खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली विमानतळावर बेड्या ठोकल्या. कर्नाटकमधील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याच्या प्रकरणात आता त्याची चौकशी सुरू आहे.
एसआयटीने सांगितले की, दुबईत एसआयटीने त्याला भारतात परतण्यासाठी व शरणागती पत्करण्यासाठी राजी केले होते. तो दुबईहून दिल्लीला रवाना झाला व साडेतीन वाजता येथे पोहोचला. त्याला पकडण्यासाठी एसआयटीचे अधिकारी दिल्लीत होते.
आयएमए जेवेल्समध्ये एक लाखाहून अधिक लोकांनी गुंतवणूक केली होती व आयएमए जेवेल्सने १७ कंपन्या सुरू केल्या होत्या. खान याने लोकांना त्याच्या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवाहन केले होते.
त्याच्या कंपनीत ४,०८४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. त्याने गुंतवणूकदारांना सुमारे १,४०० कोटी रुपये परत करणे क्रमप्राप्त होते. गुंतवणूकदारांना अधांतरी सोडून तो दीड महिन्यापूर्वी दुबईत पळाला होता. (वृत्तसंस्था)