कुंभमेळा कोरोना घोटाळा: कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत चक्क 'गुटखा' अन् 'चंपू' नावांचा समावेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:51 PM2021-06-19T12:51:12+5:302021-06-19T12:56:12+5:30
उत्तराखंडमध्ये कुंभमेळा दरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडमध्ये कुंभमेळा दरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुंभमेळा काळात जवळपास १ लाख खोट्या आरटीपीसीआर चाचण्या करुन दिशाभूल करणारा अहवाल तयार करण्यात आला होता. यात कोरोना चाचणी करण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीत चक्क 'चंपू' आणि 'गुटखा' अशा नावांचा उल्लेख करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. तब्बल १ लाख जणांच्या नावांची यादीत तयार करत असताना सामान्य स्वरुपाची नावं संपल्यानंतर यादीत चक्क 'गुटखा', 'चंपू' नावांचा उल्लेख करुन फक्त आकडा दाखवण्यासाठीचा खेळ केला गेला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ज्यांचे मोबाइल क्रमांक अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यांच्या मोबाइलवर कोरोना चाचणीचा अहवाल पोहोचल्यानंतर ते देखील चक्रावून गेले आहेत. ज्यांना असे मेसेजेस आले त्यांनी हा काहीतरी स्पॅम मेसेज आहे, असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं समोर आलं आहे. "माझ्या मोबाइलवर मला मेसेज आला की तुमचा कोरोना चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहे. पण मी कोरोना चाचणीसाठी नमुनाच दिला नव्हता. कोणतीही चाचणी मी केली नव्हती. त्यामुळे माझ्यासह संपूर्ण कुटुंब घाबरुन गेलो होतो. अधिकारी येऊन आम्हा सगळ्यानं कुठंतरी घेऊन जातील आणि काही कारण नसताना क्वारंटाइन करतील", असं हरिद्वारचे गुलाम मोहम्मद यांनी सांगितलं.
'चंपू' आणि 'गुटखा' नावांचा उल्लेख
कुंभमेळ्यातील कोरोना चाचणीचं काम खासगी एजन्सीला देण्यात आलं होतं. अहवालात बहुतेक नावांच्या आडनावाचा उल्लेख नव्हता. तर काही जणांचं नाव चक्क 'चंपू' आणि 'गुटखा' असं नमूद करण्यात आलं होतं. आरोग्य विभागाकडून ही यादी समोर आली आहे. कुंभमेळ्यादरम्यान सरकार व्यतिरिक्त ९ खासगी एजन्सीला देण्यात आलं होतं. कुंभमेळ्यात दिवसाला ५० हजार कोरोना चाचण्या करण्याचे आदेश हायकोर्टानं दिल्यानंतर या खासगी एजन्सीची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली होती.
एका खासगी एजन्सीविरोधात १ लाख फेक चाचण्या केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांकडून कोरोना चाचणीसाठीचे नमुने जमा करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि अहवाल मात्र खोटे सादर करण्यात आले होते. यात नाव आणि पत्ता सारंकाही खोटं असल्याचं निदर्शनास आलं आहे.