RSS प्रमुख मोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमाम इलियासी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 02:14 PM2022-10-12T14:14:19+5:302022-10-12T14:15:17+5:30
केंद्र सरकारने अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अहमद इलियासी यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात डॉ. उमर अहमद इलियासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची नवी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत भेट घेतली आणि त्यांना 'राष्ट्रपिता' म्हटले होते. इलियासी यांच्या या वक्तव्यावर अनेक मुस्लिम संघटना संतप्त झाल्या आहेत.
डॉ. उमर अहमद इलियासी यांनी सांगितले की, 'मला 22 सप्टेंबरपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. देशाचे वातावरण बिघडवणारे, माझा शिरच्छेद करण्याच्या धमक्या देत आहेत. सोशल मीडियावरुनही मला सतत धमक्या येत आहेत.' 22 सप्टेंबर रोजी मोहन भागवत यांनी उमर अहमद इलियासी यांची दिल्लीतील मशिदीत भेट घेतली होती. त्या बैठकीत मुस्लिम समाजातील अनेक नेतेही उपस्थित होते.
काय म्हणाले होते इलियासी?
डॉ. उमर अहमद इलियासी यांनी भागवत यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, 'भागवत आमच्या मशिदीत येणे, ही भाग्याची गोष्ट आहे. भागवत आपल्या राष्ट्राचे पिता आणि राष्ट्रऋषी आहेत. देशाची एकता आणि अखंडता कायम राहिली पाहिजे. आपल्या सर्वांच्या उपासनेचे वेगवेगळे मार्ग असू शकतात, पण त्यापूर्वी आपण सर्व मानव आहोत आणि मानवता आपल्यामध्ये राहिली पाहिजे. आपण भारतात राहतो, म्हणून आपण भारतीय आहोत.'