पंधरा राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 09:05 AM2018-05-07T09:05:46+5:302018-05-07T09:05:46+5:30
गेल्या आठवड्यात 5 राज्यांमध्ये आलेल्या वादळामुळे 124 लोकांचा मृत्यू झाला होता
नवी दिल्ली: देशातील तेरा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. याशिवाय काही भागांमध्ये गारपीटदेखील होऊ शकते, असा अंदाजदेखील हवामान खात्यानं वर्तवलाय.
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असं हवामान खात्यानं म्हटलंय. तर उत्तराखंड, पंजाबमधील काही ठिकाणी गडगडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पाच राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यामध्ये 124 जणांचा मृत्यू झाला होता. तर 300 जण जखमी झाले होते. हवामान खात्यानं दिलेल्या सूचनांचा उल्लेख करत गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली. 'आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमधील काही ठिकाणी सोमवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो. याशिवाय जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.
राजस्थानच्या पश्चिम भागात धुळीची वादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्यानं हरयाणा सरकारनं शाळांना सुट्टी जाहीर केलीय. त्यामुळे हरयाणातील 350 खासगी शाळा आणि 575 सरकारी शाळा दोन दिवस बंद राहतील. शिक्षणमंत्री प्रा. रामविलास शर्मा यांनी याबद्दलची माहिती दिलीय.