मान्सूनचं आगमन लांबणीवर, हवामान विभागाच्या अंदाजानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:46 PM2019-05-15T13:46:26+5:302019-05-15T13:47:59+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून आठवडाभर उशिरानं दाखल होणार
नवी दिल्ली: मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाआधी स्कायमेटनं काल मान्सूनच्या आगमनाचं भाकीत वर्तवलं. मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली.
मान्सूनच्या आगमनाला यंदा उशीर होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होईल. गेल्या वर्षी 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. तर 2017 मध्ये 30 मे रोजी मान्सूननं केरळमध्ये वर्दी दिली होती. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये जवळपास आठवडाभर विलंबानं दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदाचा मान्सून सर्वसाधारण असेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. 'अल निनोचा प्रभाव कमी असेल आणि पावसाचा हंगाम सुरू होताच हा प्रभाव आणखी ओसरेल. यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल,' अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
मान्सूनच्या आगमनाबद्दलचे गेल्या 14 वर्षांतील 13 अंदाज खरे ठरल्याचं हवामान खात्यानं म्हटलं. केवळ 2015 मध्ये अंदाज चुकला होता, असं हवामान खात्यानं सांगितलं. 2015 मध्ये हवामान खात्यानं 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून जवळपास आठवडाभर उशीरा (5 जून) केरळमध्ये दाखल झाला.