मोबाइलच्या 'या' नंबरसोबत जास्त 'खेळू' नका, नाहीतर तीन वर्षांचा तुरूंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 12:28 PM2017-09-25T12:28:50+5:302017-09-25T14:16:26+5:30
मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.यामध्ये दोषी आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते तसंच दंड आकारला जाईल.
नवी दिल्ली - मोबाइलच्या IMEI नंबर बदलण्याचा, चोरण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बनावट आयएमईआय क्रमांक तयार करण्याचा प्रयत्न केल्यास आता गुन्हा ठरणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून यामध्ये दोषी आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते तसंच दंड आकारला जाईल . मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. प्रत्येक मोबाइलसाठी दिला जाणारा त्याचा 15 आकडी ओळख क्रमांक, अर्थात इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेन्टिटी (आयएमईआय) क्रमांक ही त्या प्रत्येक हँडसेटची ओळख असते. दूरसंचार विभागाने 25 ऑगस्ट रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली होती.
या निर्णयामुळे खोटे IMEI नंबर आणि हरवलेले फोन पुन्हा शोधण्यात मदत होईल असा सरकारला विश्वास आहे. कोणत्याही मोबाइलच्या IMEI नंबरसोबत जाणूनबुजून छेडछाड करणं किंवा तो नंबर बदलणं गुन्हा ठरणार आहे. नव्या नियमाला छेडछाड विरोधक नियम 2017 असं नाव देण्यात आलं आहे.
सरकारने यासाठी ‘दि प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ दि मोबाइल डिव्हाइस इक्विपमेंट आयडेन्टिपिकेशन नंबर रुल्स, 2017’ हा नवा नियम तयार केला आहे. याशिवाय हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या कोणत्याही मोबाइलच्या सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या फोनचं सिम कार्ड किंवा IMEI नंबर बदलला तरीही सेवा बंद केली जाईल दूरसंचार विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.