भारतीय अर्थव्यवस्था जगात भारी; सर्वाधिक वेगानं घेणार भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 07:25 PM2019-07-23T19:25:32+5:302019-07-23T19:26:08+5:30
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला भाकीत
नवी दिल्ली: भारतीयअर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. २०१९ आणि २०२० मध्ये भारतीयअर्थव्यवस्था वाढीचा वेग ०.३ टक्क्यांनी खाली येईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. २०१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढेल. तर २०२० मध्ये यात थोडी सुधारणा होऊन अर्थव्यवस्था वाढीचा वेग ७.२ टक्क्यांवर जाईल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे.
भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावणार असला तरीही जगातील इतर देशांचा विचार केल्यास भारतच जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल. विशेष म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चीनपेक्षाही जास्त असेल, असं भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवलं आहे. '२०१९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७ टक्क्यानं वाढेल. तर २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ७.२ टक्के असेल. काही महिन्यांपूर्वी वर्तवण्यात आलेल्या अर्थव्यवस्था वाढीच्या अंदाजापेक्षा हा वेग कमी असेल,' असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.