म्यानमारमधील वांशिक तणाव तात्काळ संपवा - संयुक्त राष्ट्र सचिव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 03:22 AM2017-09-06T03:22:40+5:302017-09-06T03:26:10+5:30
म्यानमारमध्ये सुरु असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचाक तात्काळ थांबवा अशी मागणी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणिस अँटोनियो ग्युटर्स यांनी केली आहे.
न्यू यॉर्क, दि. 6- म्यानमारमध्ये सुरु असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचाक तात्काळ थांबवा अशी मागणी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणिस अँटोनियो ग्युटर्स यांनी केली आहे. म्यानमारच्या राखिन प्रांतात सुरु असलेल्या वांशिक तणाव व दंगली, जाळपोळीच्या सत्रामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये १ लाख २५ हजार लोकांनी म्यानमारची सीमा ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला आहे.
याबरोबरच या वांशिक तणावाचे पडसाद युनायटेड किंग्डमच्या हाऊस आँफ काँमन्समध्येही उमटले. मजूर पक्षाच्या सदस्य यास्मिन कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्री मार्क फिल्ड यांना म्यानमारमधील वंशच्छेदाचा तुम्ही निषेध करणार का असा प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे रोहिंग्या महिलांवर बलात्कार आणि हत्येचे सत्र सुरु असल्याचे सांगत अजूनही आंतरराष्ट्रीय समुदाय गप्प का असाही प्रश्न त्यांनी हाऊस आँफ काँमन्समध्ये केला. आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर रवांडा आणि स्रेब्रेनिकासारखा वंशच्छेद होत आहे, गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात वाईट प्रकारचा हिंसाचार तेथे होत आहे, या परिस्थितीत ताबडतोब हस्तक्षेप करण्याची गरज आहे असे यास्मिन म्हणाल्या.
यावर फिल्ड यांनी युके यासर्व घटनांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. या प्रश्नी लक्ष द्यावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत विनंती केल्याचे ते म्हणाले. तसेच राखिन प्रांतातील लोकांच्या मदतीसाठी गेली पाच वर्षे इंग्लंड ३ कोटी युरोंची मानवतेच्या आधारावर मदत करत असून त्याचा उपयोग अन्न व इतर कामासांठी होत असल्याची माहिती फिल्ड यांनी दिली.
शँडो फाँरिन मिनिस्टर लिझ मँक्लेन्स यांनी या तणावात लाखाहून अधिक निष्पाप रोहिंग्या पुरुष, महिला, मुलांना विस्थापित व्हावे लागले असून त्यांना छावण्यांमध्ये राहावे लागत असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्यांच्या मते याची परिणती वंशच्छेदामध्ये होईल अशी भीतीही त्यांनी सभागृहाच बोलून दाखवली. म्यानमारच्या नेत्या आंग सान सू ची यांनी या घटनेवर अजूनही स्पष्ट व कडक भूमिका घेतली नसल्यामुळे त्यांनी खेद व्यक्त केला. या सरकारने हा तणाव कमी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे सांगून गेल्या तीन वर्षात म्यानमारला ५ लाख युरो किंमतीची शस्त्रे विकून मोठी चूक केल्याचे लिझ यांनी सांगितले.