अनैतिक संबंधांसाठी तिने नव-याचे केले आठ तुकडे, 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 06:43 PM2017-11-22T18:43:52+5:302017-11-22T18:48:22+5:30
मी आणि माझी बहिण बलजितच्या घरी गेलो होतो पण त्याच्या पत्नीने पूजाने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
चंदीगड - नव-याची अत्यंत क्रूरपणे हत्या करणा-या हरयाणातील एका 30 वर्षीय महिलेला झंजर जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने तीसवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली होती. पूजा असे आरोपी महिलेचे नाव असून तिने नव-याच्या मृतदेहाचे आठ तुकडे केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस.दाहीया यांनी शिक्षा सुनावली.
मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात हरयाणाच्या झंजर जिल्ह्यातील असांदा गावात हे हत्याकांड घडले होते. पूजाने बलजितची (38) अत्यंत क्रूरपणे हत्या केली. न्यायालयाने फक्त पूजाला दोषी ठरवले व अन्य चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पूजाचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते. तिला या नात्यात नव-याचा अडसर नको होता. म्हणून तिने बलजितची हत्या केली.
बलजितचा भाऊ कुलजितने 26 एप्रिलला पोलीसात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मी आणि माझी बहिण बलजितच्या घरी गेलो होतो पण त्याच्या पत्नीने पूजाने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत असे कुलजितने पोलिसांना सांगितले. बलजितच्या घरी गेलो त्यावेळी शेजारच्या घरातून वास येत होता असे त्याच्या बहिणीने पोलिसांना सांगितले.
पोलीस तिथे गेले त्यावेळी एक बॅगमधून वास येत होता. बॅग उघडल्यानंतर त्यात शरीराचे वेगवेगळे अवयव होते. पोलिसांनी पूजाची कसून चौकशी केल्यानंतर तिने बलजितच्या शरीराचे आठ तुकडे करुन घराच्या वेगवेगळया भागात लपवल्याचे सांगितले. या हत्ये प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी पूजाला दोषी धरले व तीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. झंजर दिल्लीपासून 55 तर चंदीगडपासून 285 किलोमीटर अंतरावर आहे.