भाषिक वृत्तपत्रांचा प्रभाव निर्विवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 09:43 AM2023-06-04T09:43:29+5:302023-06-04T09:44:42+5:30

मराठी, मल्याळम, बंगाली, गुजराती, तेलगू, तमिळ यासारख्या भाषांतील वृत्तपत्रांची वाचकसंख्या ही भारतातील सर्वात मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे, याची दखल घ्यायलाच हवी.

impact of language newspapers is undeniable | भाषिक वृत्तपत्रांचा प्रभाव निर्विवाद

भाषिक वृत्तपत्रांचा प्रभाव निर्विवाद

googlenewsNext

शेखर गुप्ता, एडिटर इन चिफ, द प्रिंट

भारतातील पत्रकारितेची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे तिचे दिल्ली-मुंबईपुरते केंद्रीकरण होणे. हे निरीक्षण मी डॉ. विजय दर्डा यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतही नमूद केले आहे. दिल्ली आणि मुंबई, इंग्रजी आणि हिंदी म्हणजे पत्रकारिता असाच आमचा समज झाला आहे. पण प्रत्यक्षात भारतातील पत्रकारितेची खरी भरभराट इंग्रजी आणि हिंदीपलीकडे भारतीय भाषांमध्ये होत आहे.

याबाबतीत लोकमतचेच उदाहरण देता येईल. भारतात मराठी बोलणाऱ्यांची संख्या विचारात घेता लोकमतसारख्या वृत्तपत्राने एका मोठ्या भाषिक आणि वांशिक वर्गावर वर्चस्व प्रस्थापित केल्याचे  लोकमतच्या वाचकसंख्येवरून लक्षात येईल. कोणत्याही हिंदी वृत्तपत्राच्या हिंदी वाचकांवरील प्रभावाच्या तुलनेत लोकमतचा मराठी वाचकांवरील प्रभाव हा खूप मोठा आहे. मूळातच वाचकांची संख्या सूक्ष्मात असलेल्या कुठल्याही इंग्रजी वृत्तपत्राचा इंग्रजी वाचकांवर असा प्रभाव निश्चितच नाही. 

सर्व भारतीय भाषांवर नजर टाकली असता मराठी, मल्याळम, बंगाली, गुजराती, तेलगू, तमिळ यासारख्या प्रत्येक भाषेतील एकापेक्षा जास्त वृत्तपत्रांची वाचकसंख्या ही भारतातील सर्वात मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे, याची दखल आम्ही घ्यायलाच हवी. मला या वास्तवाची जाणीव कशी झाली? खरे तर ऐंशीच्या दशकात इंडियन एक्सप्रेस आणि नंतर इंडिया टुडेसारख्या सप्ततारांकित संस्थांमध्ये काम करणारा मी पण एक अहंकारी दिल्लीवाला, इंग्लिशवाला पत्रकार. माझे मालक मला एका पगारात किमान दोन नोकऱ्या करायला लावायचे. १९९० पासून माझ्याकडे इंडिया टुडेच्या तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि नंतर गुजराती अशा भाषिक आवृत्त्यांची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. इंग्रजी भाषेबाहेरचे हे किती नवे आणि वेगळे विश्व आहे याची त्यावेळी मला जाणीव झाली. हे विश्व किती प्रचंड होते आणि भारतीय पत्रकारितेत किती विपुल प्रतिभा उपलब्ध होती याचा शोध आम्ही कधी घेतलाच नव्हता. आम्ही आमच्या इंग्लिशच्या विश्वातच गुंतून पडलो होतो.

‘आमच्या व्हर्नाकुलर आवृत्त्या’, असा या भाषिक आवृत्त्यांविषयी मार्केटिंग विभागातील सहकाऱ्यांसह बहुतांश लोक उल्लेख करायचे. मला त्यावर आक्षेप होता. मी अरुण पुरींकडे गेलो. आमच्या भाषिक आवृत्त्यांसाठी व्हर्नाकुलर हा शब्द कधीच वापरु नये, असा आदेश तुम्हाला द्यावा लागेल. व्हर्नाकुलरऐवजी भारतीय भाषांमधील आवृत्त्या असे म्हणता येईल. व्हर्नाकुलर शब्द ब्रिटीश वापरायचे. त्यात उपरोध आणि तुच्छता आहे, असे मी त्यांना म्हणालो. त्यानंतर ज्या वृत्तपत्र समूहांचे मी नेतृत्व केले, तिथे हा शब्द वापरु दिला नाही.

भारतात न्यूजप्रिंटच्या खपाचा आकडा वाढतो आहे. प्रिंट मीडियाची वाढ होत असलेला भारत हा एकमेव देश आहे. बहुतांश न्यूजप्रिंटचा वापर हा भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांसाठी होत आहे. डॉ. विजय दर्डा यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखकाचा शोध त्यातूनच लागतो. पण मराठी भाषेतून बाहेर पडून डॉ. दर्डा यांनी आपले लेख इंग्रजीतही उपलब्ध करुन देत लेखन विस्तार केला आहे. त्यांचे हे योगदान मोठे आहे. कारण त्यामुळे डॉ. दर्डा यांच्या प्रतिभेची, त्यांच्या वृत्तपत्राची, त्यांच्या भागाची तसेच विदर्भाच्या ज्वलंत प्रश्नांची ओळख झाली. महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, ही वस्तुस्थितीही त्यामुळे अधोरेखित झाली. आमचे लक्ष हिंदी पट्ट्यावर आणि उत्तर प्रदेशावरच केंद्रीत झालेले असते. भारतात राजकीयदृष्ट्या दुसरे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे राज्य महाराष्ट्र आहे, याचा आम्हा दिल्लीतील समालोचकांना विसर पडतो. उत्तर प्रदेश लोकसभेवर ८० तर महाराष्ट्र ४८ खासदार पाठवतो. जोपर्यंत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठे यश मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणे अवघड आहे. त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा मान मिळालाच पाहिजे. 

या योगदानाबद्दल डॉ. दर्डा यांचे आभार मानले पाहिजे. त्यांची एका पक्षाशी असलेली राजकीय संलग्नता सर्वश्रुत आहे. ज्यांची राजकीय संलग्नता ठाऊक नसते  अशांची आणि हवा बदलली की संलग्नता बदलणाऱ्या हवामान तज्ज्ञांची मला चिंता वाटते. त्यांच्याप्रमाणे डॉ. दर्डा यांची संलग्नता बदलणार नाही. डॉ. दर्डा यांच्या लिखाणात त्यांची राजकीय संलग्नता डोकावत नाही. भारताच्या भाषिक वृत्तपत्रांनी मालक-संपादकांची परंपरा विकसित केली आहे. मालक-संपादक परंपरेने भारताची प्रादेशिक पत्रकारिता भक्कम होण्यात मोठाच हातभार लागला आहे. कारण वृत्तपत्राची मालकी असलेले कुटुंब त्यांच्या संस्थेत केवळ व्यावसायिकच नव्हे तर बौद्धिक आणि तात्विक गुंतवणूकही असते. त्यामुळे डॉ. विजय दर्डा यांच्याप्रमाणे मालक-संपादक संस्थेचे निर्मातेही  ठरतात.  

(दिनांक ३० मे रोजी नवी दिल्ली येथील  कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये  झालेल्या एका विशेष समारंभात ‘लोकमत मीडिया’चे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाईड-अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी केलेल्या भाषणाचे संपादित शब्दांकन.)


 

Web Title: impact of language newspapers is undeniable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.