ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 06:06 AM2021-01-11T06:06:29+5:302021-01-11T06:07:03+5:30
सर्व संसद सदस्यांना वॉशिंग्टनमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन
वॉशिंग्टन : अमेरिकी संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या राड्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीला आता अवघे काही दिवसच शिल्लक असताना त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी सर्व संसद सदस्यांनी या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या आठवड्यात संसदेत नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या निवडीची औपचारिकता सुरू असताना ट्रम्प समर्थकांनी संसदेवर हल्लाबोल केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात पाच जण ठार झाले. त्यात एका पोलिसाचाही समावेश होता.
उर्वरित दिवसही अध्यक्षपदी ठेवणे धोक्याचे
अमेरिकी संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या या हल्ल्याचे सर्वदूर पडसाद उमटले. ट्रम्प यांना उर्वरित दिवसही अध्यक्षपदी ठेवणे धोक्याचे असून त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी यांनी या आठवड्यात सर्व संसद सदस्यांनी राजधानी वॉशिंग्टन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जाणार आहे. त्यांनी या दडपणाला थारा न दिल्यास ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जाऊ शकते, त्यासाठी सर्व संसद सदस्यांनी राजधानीत उपस्थित राहणे गरजेचे आहे, असे पेलोसी यांनी स्पष्ट केले. २० जानेवारी रोजी ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.