शाही इमामांघरी हिंदू सून

By admin | Published: November 11, 2015 02:57 AM2015-11-11T02:57:17+5:302015-11-11T02:57:17+5:30

वाढत्या सांप्रदायिक असहिष्णुतेवरून देशभर वादंग उठले असतानाच, दिल्लीच्या जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे चिरंजीव व उत्तराधिकारी शाबन बुखारी यांनी एका हिंदू मुलीशी विवाह केल्याचे वृत्त

Imperial Imamanchari Hindu Sun | शाही इमामांघरी हिंदू सून

शाही इमामांघरी हिंदू सून

Next

नवी दिल्ली : वाढत्या सांप्रदायिक असहिष्णुतेवरून देशभर वादंग उठले असतानाच, दिल्लीच्या जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे चिरंजीव व उत्तराधिकारी शाबन बुखारी यांनी एका हिंदू मुलीशी विवाह केल्याचे वृत्त अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी मंगळवारी दिल्याने एकच खळबळ उडाली. शाही इमामांनी सूनबार्इंना इस्लाम कुबूल करायला लावून, मगच घरात घेण्याऐवजी तिला तिच्या जन्मजात धर्माचे पालन करू दिले असते, तर देशात एक आश्वासक संदेश गेला असता, असा अनेकांचा सूर होता.
२० वर्षांच्या शाबन बुखारी यांचा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका हिंदू मुलीशी प्रेमविवाह होणार असल्याच्या बातम्या गेला आठवडाभर चर्चेत होत्या. येत्या १३ नोव्हेंबरला विवाह व १५ नोव्हेंबरला स्वागत समारंभ होणार असल्याचे त्यावेळी म्हटले गेले. मात्र, जामा मशिदीचे कार्यालय प्रमुख अमानुल्ला यांनी ‘लोमकढी थाप’ असे म्हणून एका उर्दू वृत्तपत्राकडे याचा इन्कार केला होता. शाबन यांचा विवाह होणार आहे हे खरे, पण वाग्दत्त वधू हिंदू नव्हे, तर एका श्रद्धाळू मुस्लीम कुटुंबातील आहे व ती स्वत: इस्लामी धर्मशास्त्राची अभ्यासक आहे, असे त्यांचे म्हणणे होते, पण हा विवाह पार पडल्याच्या बातम्या मंगळवारी सर्वत्र पसरल्यावर मात्र, शाही इमामांचे कुटुंब अथवा जामा मशिदीकडून रात्रीपर्यंत तरी त्याचा इन्कार केला गेला नव्हता. प्रसिद्धीमाध्यमांनी अनाम सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या रविवारी सायंकाळी जामा मशिदीमध्ये निवडक नातेवाईक व कुटुंबीयांच्या उपस्थितीत शाबन यांचा विवाहसोहळा पार पडला. सय्यद अहमद बुखारी यांचा या आंतरधर्मीय विवाहाला प्रारंभी विरोध होता, परंतु हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर मात्र त्यांचा विरोध मावळला, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, शाबन आणि हिंदू मुलीदरम्यान गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि या दोघांच्याही कुटुंबीयांकडून विवाह करण्याला जोरदार विरोध झाला होता. ही मुलगी गाझियाबादची राहणारी असून, ती इस्लामचा अभ्यास करीत असल्याचे समजते.
दिल्लीतील जामा मशीद ही देशातील सर्वात मोठी मशीद असली आणि तेथील इमाम ‘शाही’ अशी बिरुदावली मिरवत असले, तरी आताच्या भारतात ते मुस्लिमांचे प्रमुख इमाम अशी स्थिती राहिलेली नाही. मोगल सम्राटांचे दिल्लीत शासन असताना त्यांनी स्वत:ला नमाज पढण्यासाठी जामा मशीद बांधली व तेथे इमाम नेमले म्हणून ते ‘शाही इमाम’ असे ओळखले जाऊ लागले. शहेनशाही गेली तरी इमामपद बुखारी कुटुंबाकडे वारसाहक्काने कायम राहिले व ‘शाही’ ही किताबतही.

Web Title: Imperial Imamanchari Hindu Sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.