विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:57 AM2020-01-13T01:57:17+5:302020-01-13T06:37:15+5:30
पाकिस्तानी छळग्रस्तांनाही नागरिकत्वाचा हक्क देणार
जबलपूर: धार्मिक छळामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश या शेजारी देशांमधून येणाऱ्या मुस्लिमेतर स्थलांतरितांना सुलभपणे भारतीय नागरिकत्व देण्यासाठी करण्यात आलेल्या नागरिकत्व कायद्यास(सीएए) कितीही विरोध झाला, तरी तो कायदा राबविला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काँग्रेससह विरोधकांना ठणकावून सांगितले.
‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मध्य प्रदेश भाजपाने आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी असेही जाहीर केले की, पाकिस्तानातून आलेल्या प्रत्येक पीडित स्थलांतरितास या देशाचे नागरिकत्व दिल्याशिवाय आमचे सरकार गप्प बसणार नाही. कितीही विरोध झाला, तरी तसे करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.
शहा म्हणाले की, भारतावर माझा व तुमचा जेवढा अधिकार आहे, तेवढाच पाकिस्तानातून येणाºया हिंदू, शिख, बौद्ध व ख्रिश्चन स्थलांतरितांचा भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा हक्क आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत व काँग्रेसने कार्यकारिणीच्या बैठकीत ‘सीएए’ रद्द करण्याची मागणी केली होती. त्याचा संदर्भ देत गृहमंत्र्यांनी, तुम्हाला जेवढा विरोध करायचा तेवढा करा, त्याने काहीच फरक पडणार नाही, असे त्यांना प्रत्युत्तर दिले. या कायद्याबद्दल दिशाभूल करून देशभर रान उठविणारे राहुल गांधी व ममता बॅनजी यांनी ज्यायोगे कोणत्याही भारतीय नागरिकाचे असलेले नागरिकत्व हिरावून घेता येईल, अशी एक तरी तरतूद त्या कायद्यात दाखवावी, असे आव्हानही शहा यांनी दिले.