धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:10 AM2024-08-16T05:10:00+5:302024-08-16T05:10:01+5:30

एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला भर

Implementation of secular civil code is the need of the hour - Prime Minister Narendra Modi | धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज असल्याचे आणि धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणाऱ्या कायद्यांना आधुनिक जगात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले.

मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या सलग तिसऱ्या कारकिर्दीतील पहिले आणि सलग ११ वे भाषण केले.  आपण ७५ वर्षे सध्याच्याच सांप्रदायिक नागरी संहितेसह जगलो आहोत. ही नागरी संहिता भेदभावाला खतपाणी घालण्याबरोबरच देशाची धार्मिक आधारावर विभागणी करते. विषमतेलाही प्रोत्साहन देते. आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे वाटचाल करायची आहे. देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता येणे ही काळाची गरज आहे, असे  मोदी यांनी नमूद केले. धर्मनिरपेक्ष नागरी संहिता ही संविधानाचा आत्मा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तिची गरज अधोरेखित केल्याचे मोदी म्हणाले. 

भ्रष्टाचाराची वाळवी

देशातील प्रत्येक नागरिक भ्रष्टाचाराच्या वाळवीने हैराण झाला आहे. भ्रष्टाचारामुळे जनतेचा सरकारवरील, प्रशासनावरील विश्वास उडतो आणि राष्ट्रीय विकासात बाधा निर्माण होते. काहीजण मात्र या वाळवीचे समर्थन करतात, तिचे उदात्तीकरण करून तिला संरक्षण देतात.

७५ हजार नव्या जागा

दरवर्षी २५ लाख भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात. त्यामुळे येत्या पाच वर्षांत वैद्यकीयच्या ७५ हजार नव्या जागा तयार करण्यात येतील. जागा वाढल्यानंतर भारतातच चांगले शिक्षण घेता येईल. 

पांढरा कुर्ता, चुडीदार आणि राजस्थानी पगडी

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना पांढरा कुर्ता आणि चुडीदारसह बहुरंगी राजस्थानी लेहरिया प्रिंट पगडी परिधान केली होती. त्यांनी देशवासीयांना उद्देशून आजवरचे सर्वात मोठे म्हणजे ९८ मिनिटांचे भाषण केले.

पीडितेला जलद न्याय मिळवून द्या

कोलकाता येथे एका निवासी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याबद्दल मोदींनी तीव्र संताप व्यक्त केला. अशा प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकारांनी अत्यंत तातडीने उपाय करावेत.

त्यांना होणाऱ्या शिक्षेला मोठी प्रसिद्धी दिली पाहिजे

आई, बहिणी आणि मुलींवर अत्याचाराचे पाप करणाऱ्यांना फाशी होऊ शकते हे माहीत व्हावे, म्हणून अशा आरोपींना ठोठावलेल्या शिक्षेला जास्तीतजास्त प्रसिद्धी दिली पाहिजे.

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारणात आणणार

राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या देशातील एक लाख युवकांना लोक प्रतिनिधी म्हणून राजकारणात आणायचे आहे. जातीवाद आणि राजकारणातील घराणेशाहीचा अस्त करण्यात देशातील या तरुणांची मदत होईल. हे युवक कोणत्याही पक्षात सामील होऊ शकतात. त्यांच्या सहभागामुळे सळसळते रक्त राजकारणात येईल आणि लोकशाहीला एक नवा विचार पुढे घेऊन जाईल.

वन नेशन, वन इलेक्शन

विविध प्रकारच्या अनेक निवडणुका वारंवार घ्याव्या लागत असल्याने देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, एक देश एक निवडणुकीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व पक्षांनी पुढे येऊन सहकार्य करावे.
- पंतप्रधान नरेंद्र माेदी

Web Title: Implementation of secular civil code is the need of the hour - Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.