भाजपासाठी पुरोहित ठरणार महत्त्वाचे, तामिळनाडूमध्ये मोट बांधण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:00 AM2017-10-03T03:00:57+5:302017-10-03T03:01:03+5:30
तामिळनाडूच्या राज्यपालपदी बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती भाजपासाठी महत्त्वाची आहे. तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश आणि विस्तार करण्याचे भाजपचे स्वप्न लपून राहिलेले नाही.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या राज्यपालपदी बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती भाजपासाठी महत्त्वाची आहे. तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश आणि विस्तार करण्याचे भाजपचे स्वप्न लपून राहिलेले नाही. अद्रमुकसोबत राजकीय आघाडी करणे आणि राज्याच्या राजकारणात अस्तित्व निर्माण करणे, यासाठी पुरोहित यांची मदत होईल, असे भाजपाला वाटते. या आघाडीत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांना घेण्याचाही भाजपाचा प्रयत्न आहे.
बनवारीलाल पुरोहित यांना पदोन्नती देऊन भाजपने विदर्भाला झुकते माप दिले आहे. या भागात पक्षाच्या एकजुटीसाठी भाजप प्रयत्न करत आहे. दक्षिणेतील तामिळनाडू या सर्वात मोठ्या राज्यात सध्या राजकीय प्रचंड अस्वस्थता आहे. सत्ताधारी अद्रमुकमध्ये गोंधणाचे वातावरण आहे आणि द्रमुकमध्येही चढ-उतार सुरू आहेत. द्रमुकचे नेते करुणानिधी यांची प्रकृतीही तोळामासा आहे. अशा काळात भाजपने पुरोहित यांना आसाममधून एका वर्षाच्या आतच तामिळनाडूत पाठविले आहे. पुरोहित लोकसभेसाठी तीनदा निवडून आले होते. यातील दोन वेळा काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले. राम मंदिराच्या मुद्यावरुन त्यांनी पक्षाला राम राम केला होता. त्यानंतर ते भाजपत सहभागी झाले व खासदारही झाले. महाराष्ट्रात ते मंत्रीही होते.
१२ आॅक्टोबरपासून दिल्लीत राज्यपाल संमेलन
१२ आॅक्टोबरपासून दिल्लीत होणाºया दोन दिवसीय राज्यपाल संमेलनासाठी पुरोहित दिल्लीत येतील. तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, तसेच अन्य भाजपा नेत्यांना भेटतील, अशी शक्यता आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच अशा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल ईएसएल नरसिम्हन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचीही सक्रीय भूमिका आहे. कारण राज्यांचा विकास आणि राजकीय स्थैर्य यासाठी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांचे मत आहे. मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या नियुक्त्या नंतर केल्या जाणार आहेत.