रेमडेसिविरच्या निर्यातीला बंदी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 02:44 AM2021-04-12T02:44:33+5:302021-04-12T07:18:06+5:30
Remedesivir : औषध निरीक्षकांना रेमडेसिविरच्या साठ्यांवर तसेच त्याच्या विक्रीच्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : देशात दररोज कोरोनाबाधितांचा नवनवा उच्चांक स्थापन होत असताना केंद्र सरकारने कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भातील एक पत्रक रविवारी केंद्र सरकारद्वारा जारी करण्यात आले.
देशात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ११ लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेमडेसिविर इंजेक्शन आणि रेमडेसिविर ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट्स (एपीआय) यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत आहे, असे केंद्र सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. औषध निरीक्षकांना रेमडेसिविरच्या साठ्यांवर तसेच त्याच्या विक्रीच्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
रेमडेसिविरची सद्य:स्थिती
- ७ भारतीय कंपन्यांकडून उत्पादन
- दरमहा ३८,८०,००० युनिट्स उत्पादनाची क्षमता
- उत्पादक कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर त्यांच्या स्टॉकिस्ट आणि वितरकांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे
रुग्णसंख्या दीड लाख
कोरोनाबाधितांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला असून गेल्या २४ तासांत देशभरात दीड लाखाहून अधिक रुग्णांची भर पडली. तर ८३९ जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात १ कोटीहून अधिक लसीकरण
महाराष्ट्र आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस दिली असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.