SBIच्या ४५ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, याबाबतीत सतर्क राहा अन्यथा खात्यातून जातील पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:10 PM2022-08-29T14:10:02+5:302022-08-29T14:10:38+5:30
SBI: जर तुमचंही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी कुठलाही मेसेज आला आहे का, जर असा मेसेज आला असेल तर सतर्क राहा.
नवी दिल्ली - जर तुमचंही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी कुठलाही मेसेज आला आहे का, जर असा मेसेज आला असेल तर सतर्क राहा. जर तुम्ही तुमची माहिती शेअर केली तर तुमचं खातं रिकामी होऊ शकतं. तसेच या मेसेजप्रमाणे कृती न केल्यास खरोखरच तुमचं खातं ब्लॉक होणार का, याबाबत जाणून घेऊयात.
पीआयबीने या व्हायरल मेसेजचं फॅक्ट चेक करून खरी माहिती समोर आणली आहे. त्यानुसार जर तुम्हालाही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर काय केलं पाहिजे पाहा. पीआयबीने आपल्या ऑफिशियल ट्विटमध्ये लिहिले की, एसबीआयच्या नावावर एक खोटा मेसेज शेअर केला जात आहे. त्यामध्ये ग्राहकांना तुमचं खातं ब्लॉक होण्यापासून वाचवायचं असेल तर लवकर तुमचा पॅन क्रमांक अपडेट करा असं सांगण्यात येत आहे.
हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारचा कुठलाही मेसेज किंवा मेल बँकेकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे तुम्हालाही असा मेसेज किंवा मेल आला असेल तर त्वरित सावध व्हा.
पीआयबीने सांगितले की, अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेजला उत्तर देऊ नका. तसेच कुणालाही आपली खासगी माहिती शेअर करू नका. असे केल्यास तुमचं खातं रिकामी होऊ शकतं. तसेच जर तुम्हालाही अशा प्रकारचे खोटे मेसेज येत असतील तर report.phishing@sbi.co.in वर तक्रार करू शकता किंवा १९३० या क्रमांकावर संपर्क साधू शकता.