Corona Vaccine: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्टरही तिचाच घ्यावा लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:24 AM2022-05-13T10:24:28+5:302022-05-13T10:30:00+5:30
गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे...
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी आपण ज्या कंपनीची लस घेतली असेल, बूस्टर डोसही आपल्याला त्याच कंपनीचा घ्यावा लागू शकतो. कारण, सरकार अद्याप दोन वेगवेगळ्या लसींचे मिश्रण करण्यास मंजुरी देण्याच्या विचारात दिसत नाही. खरे तर, सरकार सीएमसी वेल्लोरच्या अध्ययनाच्या आधारे, असा निर्णय घेऊ शकते. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे, बूस्टर डोससाठी लसींचे मिश्रण करूनही निकालात एकसूत्रता दिसून आलेली नाही.
गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे. असे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (CMC) वेल्लोरच्या अध्ययनाची समीक्षा करणाऱ्या एनटीएजीआयच्या कोरोना कार्य समूहाने गेल्या आठवड्यातच म्हटले आहे. एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोविशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस म्हणून, कोव्हॅक्सीनचा डोस दिला असता, असा रिझल्ट दिसून आला नाही. तसेच, या कार्यक्रमासंदर्भातील आव्हाने डोळ्यासमोर ठेवून, यासंदर्भात अंतिम शिफारशीसाठी NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीच्या बैठकीत चर्चा केली केली जाईल, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
बायोलॉजिकल ईचा अर्ज प्रलंबित -
सध्या देशात कोरोना लसींचे मिश्रण करण्याची परवानगी नाही. म्हणजेच, लोकांनी ज्या कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना त्याच लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे. यातच, गेल्या चार मेरोजी बायोलॉजिकल ईने भारताच्या औषध नियंत्रकांकडे एक अर्ज करत, कोवीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसाठी, बुस्टर डोस म्हणून, आपल्या 'कोरबेव्हॅक्स' लसीच्या आपतकालीन वापरास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.