(महत्त्वाचे) बंडीतून एक किलो सोन्याची तस्करी!
By admin | Published: April 18, 2015 01:43 AM2015-04-18T01:43:23+5:302015-04-18T01:43:23+5:30
Next
>भामट्यास अटक : औरंगाबाद पोलिसांची कारवाई औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शर्टच्या आत असलेल्या बंडीला खिसे बनवून त्यातून सोन्याची तस्करी करणार्या रामदास नानासाहेब सावंत (रा. रामनगर, एन-२ सिडको) याला गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या ताब्यातून १,१३० ग्रॅम सोने आणि सव्वा लाखांची रोकड जप्त केली. सावंतने हे सोने कोठून आणले, याचा पोलीस तपास करीत आहेत. मतदारांना भुलविण्यासाठी पैसे वाटप करण्याच्या हेतूने एका पांढर्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून एक जण मुंबईहून मोठी रक्कम घेऊन येत आहे. हा सर्व काळा पैसा आहे, अशी माहिती एका खबर्याने गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना कळविली. आघाव यांनी खबर्याने सांगितलेल्या बजाजनगरातील मोहटादेवी चौकाजवळ सरस्वती ज्वेलर्सजवळ सापळा रचला. काही वेळातच खबर्याने सांगितलेल्या वर्णनाची कार तेथे आली. पोलिसांनी कारची झडती घेतली. मात्र, कारमध्ये काहीच सापडले नाही. खबर्याने खोटी टीप दिली असावी, असा पोलिसांचा समज झाला. त्यामुळे सावंतला सोडून देण्याचा पोलिसांचा विचार होता. परंतु त्याची झडती सुरू करताच सावंत अंग चोरू लागला. त्यामुळे आघाव यांना संशय आला. त्यांनी त्याची बंडी तपासली असता त्यात सोन्याचा खजिनाच निघाला. या बंडीला अनेक खिसे बनविण्यात आले होते आणि त्यात सोन्याचे दागिने ठेवलेले होते. (प्रतिनिधी)-----------रामदास सावंतच्या बंडीत सोन्याची कर्णफुले, अंगठ्या, पदक, बाळी, नेकलेस, बांगड्या, मणी अशा प्रकारचे तब्बल १ किलो १३० गॅ्रम सोने आढळून आले. तसेच १ लाख २५ हजार रुपये रोख रक्कमही मिळाली. सावंतने पोलिसांना त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्यावर फारशी उलाढालही दिसली नाही.