‘तेजस’ विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी ‘लॅण्डिंग’ स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:21 AM2020-01-12T03:21:53+5:302020-01-12T03:22:24+5:30
प्रगत तंत्रज्ञान भारताने आत्मसात केल्याचे झाले सिद्ध
नवी दिल्ली : पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘तेजस’ या वजनाने हलक्या लढाऊ विमानाने शनिवारी सकाळी नौदलाच्या ‘विक्रमादित्य’ विमानवाहू युद्धनौकेवर अलगद उतरण्याची आणि पुन्हा तेथूनच उड्डाण करण्याची पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.
अरबी समुद्रात असलेल्या ‘विक्रमादित्य’ विमानवाहू युद्धनौकेवर ‘तेजस’ विमानाचे पहिले ‘अॅरेस्टेड लॅण्डिंग’ फत्ते करण्याची कामगिरी नौदलाचे अनुभवी वैमानिक कमोडेर जयदीप मावळंकर यांनी पार पाडली. डीआरडीओने तेजस लढाऊ विमान विकसित केले आहे. हवाई दलाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली अशी विमाने लवकरच तिथे दाखल होतील. त्यानंतर ‘तेजस’ची नौदल आवृत्ती तयार करण्यात आली. गोव्यातील किनारपट्टीवर असलेल्या चाचणी आस्थापनेत हे विमान प्रथमच भर समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या युद्धनौकेवर उतरविण्यात आले.
नौदलाने या घटनेचे महत्त्व विशद करताना टष्ट्वीटमध्ये नमूद केले की, युद्धनौकेवर वापरता येईल असे लढाऊ विमान विकसित करण्याचे प्रगत तंत्रज्ञान भारताने आत्मसात केल्याचे यामुळे सिद्ध झाले. आता खास नौदलासाठी लागणाºया अशा विमानांचे उत्पादन करण्याचा मार्ग प्रशस्त होईल. विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौकेची ३० लढाऊ विमाने वापरण्याची क्षमता असून, तेथे सध्या ‘मिग-२९’च्या नौदल आवृत्तीची विमाने तैनात आहेत. कालांतराने देशी ‘तेजस’ विमाने त्यांची जागा घेऊ शकतील. अन्य युद्धनौकांसाठी भारताला अशा ५९ विमानांची आवश्यकता आहे.
जमिनीवर उतरण्यापेक्षा युद्धनौकेवर विमान उतरविणे अधिक जिकिरीचे असते. कारण तेथे धावपट्टी अत्यंत आखूड असते. त्यामुळे प्रचंड वेगाने आलेले विमान खाली उतरले की, काही मीटर अंतरातच ते पूर्णपणे थांबवून उभे करावे लागते. युद्धनौकेवर अशा प्रकारे विमान उतरविण्यास ‘अॅरेस्टेट लॅण्डिंग’ म्हणतात. ते करताना विमानाचे अचूक तंत्रज्ञान व वैमानिकाचे कसब यांचा कस लागतो.
संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या कामगिरीबद्दल ‘डीआरडीओ’ व नौदलाचे अभिनंदन केले. स्वदेशी लढाऊ विमान विकसित करण्याच्या भारताच्या वाटचालीतील हा एक महान क्षण आहे, असे त्यांनी नमूद केले.