अर्थसंकल्पावर आजी-माजी पंतप्रधानांच्या सचिवांची छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 02:14 AM2016-02-11T02:14:24+5:302016-02-11T02:14:24+5:30

अर्थमंत्री अरूण जेटली संसदेत २९ फेब्रुवारी रोजी २0१६/१७ चा अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प. अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती पहाता यंदाचे बजेट कोणत्याही वर्गाला

The impression of the former prime minister's secretary on the budget | अर्थसंकल्पावर आजी-माजी पंतप्रधानांच्या सचिवांची छाप

अर्थसंकल्पावर आजी-माजी पंतप्रधानांच्या सचिवांची छाप

Next

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
अर्थमंत्री अरूण जेटली संसदेत २९ फेब्रुवारी रोजी २0१६/१७ चा अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प. अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती पहाता यंदाचे बजेट कोणत्याही वर्गाला फारसा दिलासा देणारे नसेल, अशी चर्चा राजधानीत गेल्या दोन महिन्यांपासून आहे. साहजिकच यंदाच्या बजेटमधे नेमके काय वाढून ठेवले आहे? ते खिसा कापणारे असेल की खिशात थोडीतरी बचत शिल्लक ठेवणारे असेल, याची सर्वसामान्य मध्यमवर्गीयांपासून कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत सर्वांनाच उत्सुकता आहे.
भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया तशी पूर्णत: गोपनीय आणि बरीच क्लिष्ट आहे. अर्थ विभागाशी संबंधित जे अधिकारी या प्रक्रियेत सहभागी असतात, बजेटमधल्या साऱ्या तरतुदींबाबत त्यांना पूर्ण गोपनीयता पाळावी लागते. तरीही यंदाचा अर्थसंकल्प जेटली ज्या टीमच्या भरवशावर सादर करणार आहेत, त्यातले प्रमुख अधिकारी कोण? या क्षेत्रात त्यांची पार्श्वभूमी काय? याचा मागोवा घेतल्यास काही अंदाज नक्कीच बांधता येतात.
अरविंद सुब्रमण्यम भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत. आर्थिक सुधारणांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सुब्रमण्यम, यंदाचे बजेट तयार करणाऱ्या टीमचे प्रमुख शिल्पकार आहेत. रघुराम राजन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत त्यांनी काही वर्षे काम केले आहे. दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून पदवी आणि अहमदाबादच्या आयआयएम मधून व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर पदवीनंतर हार्वर्ड विद्यापीठाची पीएच्.डी. ही त्यांनी मिळवली. हार्वर्डमधे काही काळ त्यांनी अध्यापनाचे काम केले. फॉरिन पॉलिसी मॅगेझिनने जगातल्या १00 नामांकित ग्लोबल थिंकर्समधे २0११ सालीच त्यांचा समावेश केला होता. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात सुब्रमण्यम यांनी सरकारी खर्च वाढवण्याचा सल्ला अर्थमंत्र्यांना दिला. त्यांनी तो मान्य केला व बऱ्याच प्रमाणात लागूही केला. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व बाजारपेठेतली सुस्ती उडवण्यासाठी यंदाही तशाच प्रकारचा आराखडा अर्थमंत्र्यापुढे सुब्रमण्यम यांनी सादर केल्याची चर्चा आहे. विद्यमान अर्थ सचिव रतन वाटल १९९१ साली पंतप्रधान नरसिंहरावांचे खाजगी सचिव होते. भारतात आर्थिक सुधारणांच्या पर्वाचा प्रारंभ त्यांनी जवळून पाहिला आहे. सध्या सरकारचा व्यय (एक्सपेंडिचर) विभाग त्यांच्या अखत्यारीत आहे. नाजूक आर्थिक परिस्थितीतून देशाचा प्रवास सुरू असतांना, सुब्रमण्यम यांच्या महत्वाकांक्षी योजना ते कितपत मान्य करतात, याचा बोध यंदाच्या अर्थसंकल्पातूनच होऊ शकेल. आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास बजेट टीमचे आणखी एक महत्वाचे सदस्य. बजेट विभागाचे संयुक्त सचिवपद दीर्घकाळ सांभाळल्यामुळे बजेट तयार करण्याचा त्यांना जुना अनुभव आहे. आर्थिक सुधारणांचे ते खंदे समर्थकही आहेत. यंदाच्या बजेटमधे सुधारणांशी संबंधित निर्णयांचे कितपत पडसाद दिसतात, ते पहायचे. चौथे सदस्य हसमुख अढिया हे पंतप्रधान मोदींचे निकटवर्ती आहेत. मोदी मुख्यमंत्री असतांना अढिया त्यांचे प्रधान सचिव होते. गेली १0 वर्षे मोदींच्या टीममधे अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या आहेत. यंदाच्या बजेटवर मोदींच्या प्रभावाचे तेच सूत्रधार आहेत. प्रत्यक्ष करांमधे यंदा महत्वाचे बदल झाल्यास त्यात गुजराथ काडरचे १९८१ बॅचचे अधिकारी गढियांचा सिंहाचा वाटा असेल.

बजेट टीमच्या पाचव्या महत्त्वाच्या सदस्या अंजली छिब दुग्गल आहेत. सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाचे कामकाज पहाणाऱ्या दुग्गल यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातल्या नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेटसचे प्रमाण कमी करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. दिवाळखोरी कायद्याच्या सक्त अंमलबजावणीसह यंदाच्या बजेटमधे त्या आणखी कोणते लक्षवेधी उपाय सुचवतात, हा नक्कीच उत्सुकतेचा विषय आहे.
मोदी सरकारच्या जन धन योजना आणि जन सुरक्षा योजनेला गती देण्याचे कामही दुग्गल यांच्याकडेच आहे. सरकारच्या तिजोरीत भर घालण्यासाठी अर्थमंत्री जेटलींना निर्गुंतवणूक विभागाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गतवर्षी निर्गुंतवणुकीचे ६0 हजार ५00 कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी निम्मेही पूर्ण होऊ शकले नाही. २0१६/१७ साली निर्गुंतवणूक मोहिमेला गती देण्याची जबाबदारी नीरजकुमार गुप्तांकडे आहे. या क्षेत्रात कोणता चमत्कार घडवण्याचे उद्दिष्ट ते जेटलींना सुचवतात, याकडेही सर्वांचेच लक्ष आहे.

Web Title: The impression of the former prime minister's secretary on the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.