हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांवर छापे
By admin | Published: September 27, 2015 05:56 AM2015-09-27T05:56:33+5:302015-09-27T05:56:33+5:30
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्या घरासह ११ ठिकाणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी छापे टाकले.
सिमला/ नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्या घरासह ११ ठिकाणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी छापे टाकले. लेकीच्या लग्नासाठी वऱ्हाडासोबत मुख्यमंत्री घराबाहेर पडल्यावर अवघ्या काही मिनिटांतच घरी दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. परिणामी, मुलीच्या लग्नासारख्या मंगल मुहूर्तावर सीबीआयने केलेली ही कारवाई अमानवीय आणि तद्दन सूडभावनेतून केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हिमाचलमधील भाजपा नेत्यांनी वीरभद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर हिमाचलचे सर्व ११ मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.
८१ वर्षीय सिंग सकाळी ७.३० वाजता आपल्या सरकारी निवासस्थानातून रवाना होताच त्यांच्या दिल्ली, सिमला आणि अन्य ठिकाणच्या घरांवर छाप्यांचे सत्र सुरू झाले. सीबीआयने सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा ६.१ कोटी रुपये अधिक कमाई केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. संपुआच्या शासन काळात केंद्रीय पोलाद मंत्री असताना ही बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वीरभद्र यांच्या पत्नी प्रतिभा सिंग, मुलगा विक्रमादित्य सिंग, मुलगी अपराजिता सिंग आणि एलआयसी एजंट आनंद चौहान यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
--------
सिंग आणि त्यांचे कुटुंबीय लग्नासाठी रवाना झाल्यावर काही मिनिटांतच तपास संस्थेचे १८ सदस्यीय पथक पाच वाहनांमधून सिंग यांच्या निवासस्थानी डेरेदाखल झाले. मुख्यमंत्री कुटुंबासमवेत लग्न आटोपून ११ वाजता घरी परतले; परंतु त्यावेळी घराबाहेर जमलेल्या पत्रकारांशी ते बोलले नाहीत.
-------
सूडभावनेतून ही कारवाई करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिरस्काराच्या राजकारणाचा हा एक भाग आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.
देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांवर घालण्यात आलेले छापे म्हणजे काँग्रेस नेत्यांविरुद्ध राजकीय सूड उगवण्याचा डाव असल्याचे आझाद यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वधू-वर पक्षाचे कुटुंबीय आणि पाहुणे लग्नासाठी मंदिरात जात असताना छापे टाकणाऱ्या मोदी सरकारने राजकीय वैमनस्यापोटी भारतीय संस्कृती आणि परंपरेलासुद्धा सोडचिठ्ठी दिल्याची टीका करताना आझाद म्हणाले, की मुलीच्या लग्नात विघ्न आणण्याचा हा प्रकार अत्यंत अमानवीय आहे. क्रौर्य आणि सूडभावना ही पंतप्रधानांची शैली आहे.
----------
हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने शुक्रवारी संयुक्त वक्तव्य जारी करून केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारवर राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी दबावाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता.
-----
सूडभावनेने आपल्यावर ही कारवाई केली जात आहे. यापूर्वीदेखील अशाप्रकरची कारवाई दोन वेळा झाली होती, मात्र त्यावेळी आपण निर्दोष सुटलो होतो. आताही काहीसुद्धा होणार नाही, हा आपला विश्वास आहे.
-वीरभद्र सिंग, मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश