जुन्या नोटा बाळगल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा
By admin | Published: December 28, 2016 11:08 AM2016-12-28T11:08:28+5:302016-12-28T15:48:58+5:30
चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बाळगणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेल्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जुन्या नोटांसंदर्भातील वटहुकूम जारी करण्यात आला आहे. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसंच 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचा भंग केल्यास किमान 50 हजार किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या नोटा बाळगणं आता चांगलेच महाग पडणार आहे.
चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंतची आहे. ही मुदत संपत आली असून यानंतरही जर कुणी जुन्या नोटा बाळगताना आढळलं तर त्या व्यक्तीला जुन्या नोटांच्या अध्यादेशानुसार दंड होऊ शकतो.
एखादे संशोधन किंवा मुद्राशास्त्रसाठी या नोटा बाळगण्याची परवानगी मिळू शकते. चलनातून बाद करण्यात आलेल्या किंमतीच्या सारख्याच नोटा बाजारात असू नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरण्याची परवानगी आहे, मात्र त्यासाठी योग्य कारण देणं गरजेचं असणार आहे. अध्यादेशातदेखील याची नोंद असणार आहे.
शुक्रवारपासून बँका जुन्या नोटा स्वीकारणं बंद करणार आहे. 'जुन्या नोटा बाळगणं अनधिकृत आणि दंडनीय करणं गरजेचं आहे, जेणेकरुन कोणावरही पगार किंवा भत्ता म्हणून जुनी नोट स्वीकारण्याची जबरदस्ती केली जाणार नाही', असं एका अधिका-याने सांगितलं आहे.
आरबीआयमध्ये जुन्या नोटा जमा करण्याच्या 31 मार्चपर्यंतच्या मुदतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. जुन्या चलनातील 15 लाख 4 कोटी रकमेपैकी एकूण 14 लाख कोटी आतापर्यंत बँकेत जमा किंवा बदली झाले आहेत.