पोलीस यंत्रणा, निवडणूक व्यवस्थेत सुधारणा करा
By admin | Published: September 11, 2014 02:31 AM2014-09-11T02:31:10+5:302014-09-11T02:31:10+5:30
पोलीस यंत्रणा राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप करीत ही यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्था सुधारण्यासाठी देशातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे़
नवी दिल्ली : पोलीस यंत्रणा राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप करीत ही यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्था सुधारण्यासाठी देशातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे़
ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार राम जेठमलानी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठित नागरिकांच्या समूहाने यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे़ या समूहात माजी प्रशासकीय अधिकारी भुरेलाल, माजी सीबीआय संचालक जोगिन्दर सिंह, माजी पोलीस महासंचालक प्रकाशसिंह व शशिकांत, सामाजिक कार्यकर्ते पी़व्ही़राजगोपाल, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डी़ एस़ तेवतिया यांचा समावेश आहे़ लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि वरिष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांनीही या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे़ न्यायालयीन निर्देशांकडे लक्ष वेधत, पोलीस यंत्रणेतील सुधार आणि या यंत्रणेत पुन्हा प्राण ओतण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची विनंती आम्ही करतो़ भारतात पोलीस राजकारण्यांची नव्हे तर जनतेची असली पाहिजे, असे या पत्रात म्हटले आहे़ निवडणूक प्रणालीत सुधार करून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना संसद व विधिमंडळात येण्यापासून रोखावे, यावरही त्यांनी जोर दिला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)