सुधारणा आता अप्रिय वाटत असल्या तरी कालांतराने फायदेशीर - नरेंद्र माेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:15 AM2022-06-21T07:15:03+5:302022-06-21T07:16:12+5:30
Narendra Modi: काही निर्णय आणि सुधारणा आता अप्रिय वाटत असल्या तरी कालांतराने देशाला त्याचे फायदे अनुभवायला मिळतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्पष्ट केले. अग्निपथ योजनेविरोधात देशात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.
बंगळुरु - काही निर्णय आणि सुधारणा आता अप्रिय वाटत असल्या तरी कालांतराने देशाला त्याचे फायदे अनुभवायला मिळतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्पष्ट केले. अग्निपथ योजनेविरोधात देशात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.
येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते. मोदी म्हणाले की, २१व्या शतकातील भारत संपत्ती, रोजगार निर्माण करणारा आणि नव उपक्रम करणाऱ्यांचा आहे. ही देशाची खरी ताकद आहे. सरकार त्यांना गत आठ वर्षांपासून प्रोत्साहित करत आहे. देशाला या मार्गावर घेऊन जाणे सोपे नव्हते. काही निर्णय तात्पुरत्या स्वरुपात अप्रिय वाटू शकतात. पण, कालांतराने देशाला त्याचे चांगले अनुभव येतात.
अग्निपथ आंदोलनाचा अप्रत्यक्ष दिला संदर्भ
सैन्याच्या तिन्ही दलात चार वर्षांसाठी अग्निपथ योजनेंतर्गत भरती करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर देशाच्या अनेक भागातून तरुणांचा याला विरोध होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा या राज्यात संतप्त आंदोलकांनी रेल्वेची तोडफोड करत जाळपोळ केली. या आंदोलनात दोन जणांचा मृत्यू झाला. ही योजना सरकारने मागे घ्यावी अशी मागणी या आंदोलकांकडून होत आहे. त्याचाच पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्षपणे संदर्भ यावेळी दिला.
अग्निपथद्वारे भूदलातील पदांसाठी पुढील महिन्यापासून ऑनलाइन नावनोंदणी
नवी दिल्ली : वायुदलाच्या पाठोपाठ भूदलानेही अग्निपथ योजनेच्या अंतर्गत सैनिक भरती करण्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी केली. भूदलातील या भरतीसाठी अर्जदारांची ऑनलाइन नावनोंदणी पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. देशभरातून विरोध होत असला तरी अग्निपथ योजना राबविण्यावर तीनही सैन्यदले ठाम आहेत.
अग्निपथद्वारे होणाऱ्या सैन्यभरतीसाठी पात्रतेच्या असलेल्या अटी, भरती प्रक्रिया, वेतन व भत्त्यांचा तपशील, सेवेचे नियम आदींची माहिती या अधिसूचनेत देण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत सैन्यात चार वर्षांकरिता
भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता अर्जदारांना www.joinindianarmy.nic.in इथे नावनोंदणी करता येणार आहे.
या पदांसाठी होणार भरती : भूदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अग्निवीर ही सैन्यामध्ये वेगळी रँक असेल. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लार्क, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी उत्तीर्ण), अग्निवीर ट्रेड्समन (८वी उत्तीर्ण) या पाच श्रेणींसाठी ही भरती होणार आहे.
ट्रेड्समन पदांसाठी स्वतंत्र प्रक्रिया
ट्रेड्समन पदांसाठी १० वी व ८वी उत्तीर्ण असलेल्यांची स्वतंत्रपणे भरती केली जाईल. साडेसतरा ते तेवीस वर्षे वयोगटातील युवकांनाच या पदांसाठी अर्ज करता येईल.
अशी होईल वायुदल, नौदलाची भरती
अग्निपथद्वारे नौदलातील भरतीसाठी नौदल मुख्यालय २१ जूनपर्यंत दिशानिर्देश जारी करेल. पहिली बॅच २१ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू करेल. या योजनेद्वारे वायुदलातील भरतीसाठी अर्जदारांची नोंदणी २४ जूनला सुरू होईल. २४ जुलैला ऑनलाइन परीक्षा असेल.
हे आहेत पात्रतेचे निकष : सर्वसाधारण पदांसाठी उमेदवार कमीत कमी १०वी उत्तीर्ण असावा. त्याला किमान ४५ टक्के गुण मिळालेले असावेत. टेक्निकल एव्हिएशन, ॲम्युनेशन पदासांठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्लिश या विषयांत १२ वी परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. क्लार्क, स्टोअरकीपर या पदांसाठी कला, विज्ञान, वाणिज्य या शाखांपैकी विद्यार्थी अर्ज करू शकतील.