९ वर्षांत, ९ सरकारं पाडली, म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर, करून दिली ती आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 08:38 PM2023-08-08T20:38:18+5:302023-08-08T20:41:18+5:30
Supriya Sule Vs BJP : भाजपाने गेल्या ९ वर्षांत ९ सरकारे पाडल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका केली. मात्र या टीकेला भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर घणाघाती टीका केली. तसेच भाजपाने गेल्या ९ वर्षांत ९ सरकारे पाडल्याचा आरोप करत फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका केली. मात्र या टीकेला भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी इतिहासाची आठवण करून देत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.
निशिकांत दुबे म्हणाले की, सुप्रिया सुळे खूप बोलत होत्या. म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं होतं. हो म्हटलं होतं. पंतप्रधानांनी म्हटलं होतं. भाजपाही म्हणतो. आम्ही असं म्हणत असतो. मी थोडं इतिहासात डोकावून पाहिलं, की १९८० मध्ये शरद पवार यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं. आम्ही तर नाही केलं? या काँग्रेस पक्षानं बरखास्त केलं. शरद पवार यांनी कुठल्या आधारावर एक वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला होता. आम्ही तर वेगळा पक्ष बनवायला सांगितला नव्हता.
आम्ही जेव्हा येथे पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा रोज महागाईवर चर्चा व्हायची. अखेर शरद पवार यांना ग्राहकांसंबंधीचं खातं सोडावं लागलं. त्यानंतर २०१२-१३ मध्ये, ज्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख होतो. त्याबाबतची श्वेतपत्रिका पृथ्वीराज चव्हाण यांनीच काढली होती. तसेच छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनासंबंधीचा खटला पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातच दाखल झाला. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा खटलाही काँग्रेसच्या काळातच दाखल झाला, आम्ही काय केलं, असा सवाल निशिकांत दुबे यांनी केला.
दरम्यान, अविश्वास प्रस्तावावर भाषण करतना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली, मग कसं सहन करायचं?, मोदी सरकारला काहीच वाटत नाही?, त्या भारताच्या मुली नाहीत का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होती.