बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी अनोखी शक्कल, बनवले राम मंदिर; मोदी-योगींना केले द्वारपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 02:20 PM2024-01-31T14:20:23+5:302024-01-31T14:21:02+5:30
बेकायदा बांधकाम पाडले जाऊ नये, यासाठी एका व्यक्तीने चक्क गच्चीत राम मंदिर बांधले असून, मोदी आणि योगी यांचे पुतळे द्वारपाल म्हणून बसवले आहेत.
अंकलेश्वर: गेल्या काही दिवसांपासून बेकायदा बांधकामांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, एका व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली आहे. अवैध बांधकाम वाचवण्यासाठी या व्यक्तीने गच्चीत राम मंदिराचे बांधकाम केले असून, या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना द्वारपाल केले आहे. गुजरातमधील अंकलेश्वर या भागात ही क्लृप्ती लढवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अंकलेश्वर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपले बेकायदेशीर बांधकाम वाचवण्यासाठी मंदिर बांधले आहे. भरूच-अंकलेश्वर नागरी विकास प्राधिकरणाकडून या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात येणार होती. मोहनलाल गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या वर्षी मोहनलाल गुप्ता यांनी एका इमारतीत अतिरिक्त मजला बांधला होता. मात्र, आता मोहनलाल गुप्ता यांनी या बेकायदा अतिरिक्त मजल्याच्या वरती श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे एक मंदिर बांधले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे पुतळे मंदिराबाहेर ठेवण्यात आले आहेत. मोदी आणि योगींना द्वारपाल म्हणून दाखवण्यात आले आहे.
तक्रारीनंतर बांधले राम मंदिर
भरूच-अंकलेश्वर नागरी विकास प्राधिकरणाने मोहनलाल गुप्ता यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. मोहनलाल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ही मालमत्ता खरेदी केली होती. गडखोल ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी घेतली होती. दुसरीकडे, अंकलेश्वरच्या गडखोल गावातील जनता नगर सोसायटीत राहणाऱ्या मनसुख रखसिया यांनी बेकायदा बांधकामाबाबत तक्रार केली. तक्रार आल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी इमारतीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. या प्रकारानंतर मोहनलाल गुप्ता यांनी गच्चीवर राम मंदिर बांधल्याचे आढळून आले. हे अवैध असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, द्वेषपूर्ण भावनेतून ही तक्रार केल्याचा आरोप गुप्ता यांनी केला. मी काही भाग पाडून बदल केले आहेत. माझ्याबद्दल मत्सर करणारे आणि बांधकाम पाडण्याची धमकी देणारे काही लोक आहेत. त्यांनी माझ्याकडे पैसेही मागितले आहेत, असा दावा मोहनलाल गुप्ता यांनी केला आहे.