कोणत्याही हवामानात सैन्य चीन सीमेपर्यंत जाणार; सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 05:45 AM2024-03-10T05:45:05+5:302024-03-10T05:45:19+5:30
चीनच्या सीमेपर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेला बोगद्या’सह ५५,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व व शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.
ईटानगर : ईशान्य भारताच्या विकासाकडे काँग्रेसने नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. आपल्या सरकारने ५ वर्षांत जी विकासकामे ईशान्येत केली, त्यासाठी काँग्रेसला २० वर्षे लागली असती, असेही मोदी यांनी म्हटले.
चीनच्या सीमेपर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेला बोगद्या’सह ५५,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व व शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हे विकास प्रकल्प आहेत. त्यानिमित्त अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे त्यांची जाहीर सभा झाली.
असा आहे सेला बोगदा
- सेला बोगदा हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे.
- जुळ्या बाेगद्यांपैकी एक बोगदा १,००३ मीटर, तर दुसरा १,५९५ मीटर लांब आहे.
- त्याला ८.६ किमी लांबीचा ॲप्रोच व लिंक रोड आहे.
- संकटाच्या काळात बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र सुटका मार्ग त्यात आहे.
- तो समुद्र सपाटीपासून १३ हजार फूट उंचीवर आहे.
- दररोज ३ हजार कार आणि २ हजार ट्रक बोगद्यातून धावू शकतात.
- बोगद्यात ताशी ८० किमी वेगाने वाहने धावू शकतील.
- बोगद्याच्या बांधकामासाठी ९० लाख मनुष्य तास लागले. सरासरी ६५० कामगारांनी ५ वर्षे त्यावर काम केले.
- बांधकामासाठी ७१ हजार मेट्रिक टन सिमेंट, ५ हजार मेट्रिक टन स्टील आणि ८ हजार मेट्रिक टन स्फोटके लागली.
३५ हजार घरकुलांचे वाटप
अरुणाचल प्रदेशातील ४१ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन यावेळी मोदी यांनी केले. पंतप्रधान घरकुल योजनेतील ३५ हजार घरांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.