स्वप्नपूर्ती! आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यानं मुलींना चक्क हेलिकॉप्टरमधून पाठवलं सासरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 04:41 PM2023-02-24T16:41:07+5:302023-02-24T16:42:10+5:30
उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : जेव्हा आपल्या मुलीचे लग्न असते तेव्हा प्रत्येक पालकांची इच्छा असते की, आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे. प्रत्येक वडिलांची अशी भावना असते की, आपल्या मुलीला जगातील प्रत्येक सुखाचा आनंद द्यावा. त्यामुळे आई वडील मोठा खर्च करून आपल्या मुलीच्या लग्नात अनोख्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. याचाच प्रत्यय म्हणजे उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका शेतकऱ्याने आपल्या मुलींना चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवले आहे. मुलींच्या या अनोख्या प्रस्थानाची माहिती मिळताच ती पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली.
दरम्यान, हेलिकॉप्टरने मुलीला सासरी पाठवण्याची ही घटना भोजिपुरामधील डोहना येथील आहे. खरं तर मिरगंज पोलीस स्टेशन परिसरातील हल्दी कलान गावात वऱ्हाड आले होते. भोजिपुरा पोलीस स्टेशन परिसरातील डोहाना येथील रहिवासी राजेंद्र सिंग यादव आणि त्यांचा धाकटा भाऊ रामदास यांनी मिरगंजमधील हल्दी काला गावातील स्थळांशी त्यांच्या मुलींचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काल रात्री वऱ्हाडी मंडळी लग्नस्थळी आले होते, त्यानंतर या दोन बहिणींना सकाळी हेलिकॉप्टरमधून सासरी पाठविण्यात आले. प्रियांका आणि प्रीती यांनी रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि त्यानंतर निरोप घेतला.
शेतकऱ्यानं आईचं स्वप्न केलं पूर्ण
मुलीला हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवल्यानंतर नवरीच्या वडिलांनी सांगितले की, प्रियांकाच्या आजीने तिच्या नातीला हेलिकॉप्टरला सासरी पाठवावे अशी इच्छा व्यक्त केली. तसेच प्रियांका आणि तिचा नवरा त्यांच्या लग्नात हेलिकॉप्टर आणल्याने आनंदित आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोक हेलिकॉप्टरने मुलीला निरोप देताच त्यांना भेटायला आले. हेलिकॉप्टरमधून मुलींना सासरी पाठवल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"