लॉजवर अन्य धर्माच्या पुरूषासोबत बुरखा घातलेली महिला; ६ आरोपींचं खोलीत जाऊन भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:19 PM2024-01-11T14:19:00+5:302024-01-11T14:19:27+5:30
बुरखा घातलेली महिला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये गेली होती.
बंगळुरू: कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बुरखा घातलेली महिला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये गेली होती. याची माहिती मिळताच सहा जण जबरदस्तीने या हॉटेलच्या खोलीत शिरले आणि जोडप्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपींनी घटनेचा व्हिडीओ देखील केला आहे. हावेरी जिल्ह्यातील हनागल तालुक्यातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलच्या खोलीबाहेर सहा जण पोहोचल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. मग त्यांनी दार ठोठावले आणि दार उघडले. दरवाजा उघडताच सर्व आरोपी आत शिरले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात. महिलेने बुरखा उचलून तो घालण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने तिलाही मारहाण केली.
आरोपींनी महिलेसोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीलाही मारहाण केली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोन-तीन हल्लेखोरांनी त्याला पकडले. यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर लॉजबाहेर चित्रित करण्यात आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये ती महिला आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. परंतु हल्लेखोर तिचा बुरखा उचलून तिला व्हिडीओमध्ये दाखवण्याचा करतात. संबंधित जोडप्याने हणागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन आरोपींना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 जानेवारी रोजी हणागल येथील नल्हारा क्रॉस येथील हॉटेलमध्ये घडली. सहा आरोपींवर हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचे गुन्हे दाखल आहेत. सहापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्य चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.