गेमच्या नादात प्रियकराने गमावले पैसे! प्रेयसीने रचला अपहरणाचा कट; घरच्यांकडून १० लाख मागितले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:14 PM2024-01-24T15:14:38+5:302024-01-24T15:15:43+5:30
ऑनलाईन गेमच्या नादात प्रियकराने पैसे गमावल्यानंतर प्रेयसीने असा कट रचला की पोलिसांनाही धक्का बसला.
प्रेमाला सीमा नाही आणि प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे बोलले जाते. ऑनलाईन गेमच्या नादात प्रियकराने पैसे गमावल्यानंतर प्रेयसीने असा कट रचला की पोलिसांनाही धक्का बसला. पैशांचे नुकसान भरून काढण्यासाठी संबंधित प्रेयसीने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. तिने अपहरणाचा कट रचून तिच्याच घरच्यांकडून १० लाख रूपये मागितले. बिहारच्या भागलपूर येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले.
भागलपूर येथील अशोक रजक या व्यक्तीने २० जानेवारी रोजी स्थानिक नवगचिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत सांगितले की, त्यांची भाची नेहा कुमारी सकाळी १० वाजता कॉलेजला गेली पण संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घरी परतली नाही. कॉलेज आणि कोचिंगमधूनही नेहाची माहिती मिळाली नाही. अचानक २१ जानेवारीला नेहाच्या मोबाईलवरून तिच्या मामाच्या नंबरवर फोन आला. त्यांनी नेहा त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. १० लाखांची खंडणी दिल्यानंतर तिची सुटका करू अशी धमकी देण्यात आली.
प्रेयसीने रचला अपहरणाचा कट
अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच एसपी सुशांत कुमार सरोज यांनी तातडीने तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या संभाव्य अड्ड्यावर छापे टाकले. मग अपहरणकर्त्यांनी मुलीला भागलपूरमध्ये लपवून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी मुलीला भागलपूरमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले. यासोबतच अपहरण करणाऱ्या तीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन तरुण नवगचिया येथील श्रीपूर येथील रहिवासी आहेत. आरोपींमध्ये आयुष कुमार, गौरव कुमार आणि तिसरा एक अल्पवयीन आहे.
कॉलेजमध्ये झाले प्रेम
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर नेहा कुमारीने सर्व प्रकरणाची माहिती दिली. तिने सांगितले की, ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून वर्गातील आशिष कुमार नावाच्या मुलाशी तिचे प्रेमसंबंध आहेत. तसेच आशिष कुमार आणि आशिषच्या अटक केलेल्या दोन्ही मित्रांनी सांगितले की, आशिष ऑनलाइन गेमिंगमध्ये खूप रमला होता. त्याने मोठी रक्कम गुंतवली पण त्याच्या हाती काहीच लागले नाही.
दरम्यान, २० तारखेला कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने नेहा प्रियकर आशिषसोबत भागलपूरला गेली. ती आशिषचा मित्र आयुषच्या मैत्रिणीच्या लॉजमध्ये लपली आणि तिथून तिने तिच्या मोबाईलवरून आजोबा अशोक रजक यांना फोन करून प्रियकर आशिषशी बोलायला लावले. नेहाला सोडवण्यासाठी आशिषने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी लॉजमधून नेहाला ताब्यात घेतले आहे.