बिहारमध्ये NDAमधील जागावाटपाचा तिढा भाजपानं सोडवला, जेडीयूसह मित्र पक्षांना दिल्या एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 18:10 IST2024-03-13T18:09:57+5:302024-03-13T18:10:57+5:30
NDA Seat Sharing In Bihar News: वाढलेल्या मित्रपक्षामुळे भाजपासाठी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप करणं ही डोकेदुखी ठरली होती. अखेर बिहारमधील एनडीएच्या मित्रपक्षांमधील जागावाटपाचा तिढा भाजपानं सोडवल्याचं वृत्त समोर येत आहे.

बिहारमध्ये NDAमधील जागावाटपाचा तिढा भाजपानं सोडवला, जेडीयूसह मित्र पक्षांना दिल्या एवढ्या जागा
वाढलेल्या मित्रपक्षामुळे भाजपासाठीबिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप करणं ही डोकेदुखी ठरली होती. अखेर बिहारमधील एनडीएच्या मित्रपक्षांमधील जागावाटपाचा तिढा भाजपानं सोडवल्याचं वृत्त समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये जीतन राम मांझी यांच्या हम पक्षाला एक जागा, उपेंद्र कुशवाहा यांना एक जागा, पशुपती पारस यांच्या पक्षाला एक जागा, चिराग पासवान यांच्या पक्षाला ४ जागा आणि जेडीयूला १६ जागा देण्याचे भाजपाने निश्चित केले आहे. तर भाजपा स्वत: १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
बिहारमधील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. या बैठकीमध्ये चिराग पासवान आणि मंगल पांडेय हे सहभागी झाले होते. त्यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. त्याआधी मंगल पांडेय यांनी पशुपती पारस यांच्यासोबतही जागावाटपाबाबत चर्चा केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा हाजीपूर मतदारसंघ चिराग पासवान यांना देऊ इच्छित आहे. मात्र हाजीपूर येथून पशुपती पारस हे खासदार आहेत. तसेच आपणच इथून निवडणूक लढवणार असा दावा करत आहेत. चिराग पासवानही हाजीपूरवर दावा करत आहेत. रामविलास पासवान यांनी हयात असताना हा मतदारसंघ आपल्याला दिला होता, असा पशुपती पारस यांचा दावा आहे.
दरम्यान, पासवान यांनी ट्वीट करत सांगितलं की, एनडीएच्या सदस्याच्या रूपात आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये जागावाटपाला अंतिम रूप दिलं आहे. योग्यवेळी त्याबाबतची अधिकृत घोषणा होईल.