बिहारमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’, मांझींचा फोन स्वीच ऑफ, NDAचे अनेक आमदार संपर्काबाहेर, बहुमत चाचणीत होणार उलथापालथ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:44 AM2024-02-12T09:44:03+5:302024-02-12T09:45:39+5:30
Bihar Political Update: ऐन निवडणुकीआधी महाआघाडी सोडून पुन्हा एनडीएमध्ये येऊन मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार आज बहुमत चाचणीला सामोरे जामार आहेत. मात्र आज होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी रात्रभर बिहारची राजधानी पाटणामध्ये शह काटशहाचा खेळ सुरू होता.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारच्या राजकारणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. ऐन निवडणुकीआधी महाआघाडी सोडून पुन्हा एनडीएमध्ये येऊन मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार आज बहुमत चाचणीला सामोरे जामार आहेत. मात्र आज होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी रात्रभर बिहारची राजधानी पाटणामध्ये शह काटशहाचा खेळ सुरू होता. त्यातच भाजपा आणि जेडीयूमधील काही आमदार नॉट रिचेबल असल्याने तसेच एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या जीतनराम मांझी यांचा फोन स्वीच ऑफ येत असल्याने नितीश कुमार आणि भाजपाचं टेन्शन वाढलं आहे. तर तेजस्वी यादव मागच्या काही दिवसांपासून करत असलेल्या दाव्याप्रमाणे आज विधानसभेत नितीश कुमार यांचा गेम करणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बिहारमधील बहुमतच चाचणीची वेळ जसजशी जवळ येतेय तसतसं येथील राजकीय चित्राबाबतचा संभ्रम अधिकच वाढत चालला आहे. बहुमत चाचणीत गेम होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काल रात्रीपासून ४ आमदार असलेल्या हम पार्टीचे प्रमुख जीतनराम मांझी यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नितीश कुमार आणि एनडीएचं टेन्शन वाढलं आहे. मांझीचा फोन बंद असल्याचे समोर आल्यानंतर भाजपाचे नेते नित्यानंद राय यांनी जीतनराम मांझी यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली आहे. बहुमत चाचणीवेळी नितीश कुमार यांना पाठिंबा देण्यास बांधील नसल्याची भूमिका मांझी यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
एवढंच नाहीतर रात्रीपासून एनडीएच्या आठ आमदार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये जेडीयूच्या पाच आणि भाजपाच्या तीन आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे एनडीएची चिंता अधिकच वाढली आहे. आठ आमदार कमी असल्यास नितीश कुमार हे कुठला तरी मोठा निर्णय घेतील, असाही दावा केला जात आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांना धक्का देण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरजेडीकडूनही गंभीर आरोप केले जात आहेत. काल रात्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोलीस दोन वेळा धडकल्याने आरजेडीचे नेते संतप्त झाले आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार चेतन आनंद यांच्याबाबत पाटणा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. चेतन आनंद यांचं अपहरण करून त्यांना तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस याचा तपास करण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र मी येथे स्वेच्छेने आलो आहे, असा जबाब आनंद यांनी दिला. त्यामुळे पोलीस जाबाब नोंदवून माघारी परतले.