नवरदेवाला मस्करी सहन होईना, भरमंडपात ढसाढसा रडला; चिडलेल्या नवरीनं घोषणाच केली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:09 PM2023-06-14T20:09:14+5:302023-06-14T20:10:10+5:30
नवरीच्या या भूमिकेनंतर आनंदाच्या वातावरण शांतता पसरली. मुलगी आणि मुलाकडच्या नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाला.
सारण - बिहारच्या सारण इथं एका लग्नात घडलेला प्रकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कोपाच्या मोतीलाल यांचा मुलगा प्रशांतच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मोठ्या धुमधडाक्यात वऱ्हाड लग्नस्थळी पोहचले. मुलीकडच्या लोकांनी नवऱ्याचे आणि पाहुण्यांचे स्वागत केले. लग्नामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. मित्रमंडळी, पै-पाहुण्यांमध्ये उत्साह पसरला होता. सगळेजण खुशीत होते. लग्नाच्या विधीही पुढे सरकत होत्या.
वधू-वर एकमेकांना हार घालण्याच्या बेतात होते तेव्हा नवरी आणि तिच्या मैत्रिणींनी नवऱ्याची मस्करी करण्यास सुरुवात केली. नवरीच्या मैत्रिणीचा नवऱ्यावर संशय येत गेला. नवरा मंदबुद्धी आहे असं त्या म्हणू लागल्या. नवऱ्याची हालचाल पाहून नवरीच्या मैत्रिणींनी नवऱ्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मैत्रिणींनी जास्त दबाव टाकल्यानंतर नवऱ्याला आवरले नाही तो भरमंडपात रडू लागला. नवऱ्याला अशाप्रकारे रडताना पाहून नवरीला धक्का बसला.
संतापलेल्या नवरीने नवऱ्याचा हा चेहरा पाहून त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. नवऱ्याची मानसिक अवस्था ठिक नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी त्याच्याशी लग्न करणार नाही असं नवरीने मंडपात स्पष्ट केले. नवरीच्या या भूमिकेनंतर आनंदाच्या वातावरण शांतता पसरली. मुलगी आणि मुलाकडच्या नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाला. दोन्हीही कुटुंब आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले. मुलीच्या या निर्णयाची माहिती गावकऱ्यांना समजली. त्यानंतर गावकरी मोठ्या संख्येने लग्न मंडपात जमले.
नवरीला गावकऱ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने लग्न करण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर मुलीकडच्या लोकांनी नवऱ्याला हुंडा म्हणून दिलेल्या वस्तू परत मागितल्या त्यामुळे तणाव आणखी वाढला. गावातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत दोन्ही कुटुंबातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वऱ्हाड माघारी परतले. गावात मुलीने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयामुळे अनेक चर्चा सुरू झाली. कोणी तिचा निर्णय योग्य असल्याचे बोलले तर काहींनी निर्णय घेण्यास घाई केली असं सांगत मुलीला टोमणे मारले.