बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 09:09 AM2024-09-19T09:09:27+5:302024-09-19T09:09:40+5:30
Bihar News: बिहारमधील नवादा जिल्ह्यात जमिनीच्या वादामधून गावगुंडांनी दलितांच्या वस्तीमध्ये जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार या जाळपोळीत सुमारे ८० घरं जळाली आहेत. मात्र पोलिसांनी २० घरं या आगीत जळाल्याची आणि कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली आहे.
बिहारमधील नवादा जिल्ह्यात जमिनीच्या वादामधून गावगुंडांनी दलितांच्या वस्तीमध्ये जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार या जाळपोळीत सुमारे ८० घरं जळाली आहेत. मात्र पोलिसांनी २० घरं या आगीत जळाल्याची आणि कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेवरून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
जाळपोळीची ही घटना नवादा येथील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननौरा जवळील कृष्णानगर दलित वस्तीमध्ये घडली आहे. येथे दोन पक्षांमध्ये वाद सुरू होता. त्यावरून बुधवारी संध्याकाळी काही गावगुंडांनी दलित कुटुंबांना मारहाण केली. त्यानंतर गोळीबार करून घरांना आग लावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार गावातील जमिनीच्या काही भागावर सध्या दलित कुटुंबीयांचा कब्जा आहे. या जमिनीवरील कब्जावरून दुसऱ्या पक्षासोबत वाद सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ सुरू आहे. गावातील काही गावगुंडांनी बुधवारी संध्याकाळी अचानक हल्ला केला. त्यानंतर मारहाणीसह त्यांच्या घरांना आग लावली, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. आग लावल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे फायर ब्रिगेडला तातडीने रवाना करण्यात आले.
दरम्यान, एसपी अभिनव धीमान यांनी सांगितले की, काही व्यक्तींकडून घरांना आग लावण्यात आल्याची माहिती आम्हाला संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मिळाली. सुरुवातीला ४० ते ५० घरांची जाळपोळ झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आम्ही रात्री केलेल्या पाहणीमध्ये सुमारे २१ घरांची जाळपोळ झाल्याचं समोर आलं आहे. पुढे सविस्तर सर्व्हे केला जाईल. तसेच या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. त्याबरोबरच इथे गोळीबारासारखाही कुठला प्रकार घडलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.