"माझी नाही तर दुसऱ्याचीही...", प्रेमप्रकरणातून 'गोळीबार', प्रियकर ठार तर प्रेयसी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 04:26 PM2023-09-22T16:26:09+5:302023-09-22T16:26:43+5:30
बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रियकराने आपल्या प्रेयसीला गोळी घातली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर उपचार सुरू असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. गोळी झाडल्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी दोघांनाही रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल जप्त केले आहे.
दरम्यान, राजू कुमार असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे शेजारीच राहणाऱ्या तरूणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. मुलाला मुलीशी लग्न करायचे होते. पण, मुलीने नकार दिल्याने त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. खरं तर एकतर्फी प्रेमातून तरूणाने गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत राज कुमार हा पाटण्यात खासगी नोकरी करण्यासोबतच शिक्षण घेत होता. त्याचे वडील शेती आणि गुरे पाळून उदरनिर्वाह करतात. तर मुलगी विद्यार्थिनी आहे. मुलगी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
भररस्त्यात थरार
मुलीचे लग्न ठरले होते, हे कळताच तरूणाला राग अनावर झाला. घटनेच्या दिवशी तरूणी क्लासवरून घरी परतत होती. यादरम्यान राजूने तिला थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तरूणीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर संतापलेल्या राजूने तरुणीवर दोन वेळा गोळ्या झाडल्या मुलगी जमिनीवर पडल्यावर तरुणाने स्वतःवरही गोळी झाडली. यानंतर ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले आणि तेथे उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले.
दोन महिन्यांनंतर होतं लग्न अन्...
गोळीबाराच्या घटनेनंतर मुलीच्या आईने सांगितले की, मुलीचे लग्न ठरले होते आणि दोन महिन्यांनी तिचे लग्न होणार आहे. अशातच ही घटना आमच्या कानावर पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरूणी शेजारीच राहतात. प्राथमिक माहितीनुसार, हे एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे दिसते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितांनी तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई केली जाईल.