२ बहिणी एकमेकांच्या प्रेमात, लग्नही झाले! समलिंगी विवाहावर कुटुंबीयांचा आक्षेप; प्रकरण पोलिसांत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 04:09 PM2023-11-07T16:09:49+5:302023-11-07T16:10:22+5:30
दोन्ही बहिणींनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता दिली नसली तरी देशाच्या विविध भागातून त्यासंबंधीच्या बातम्या समोर येत असतात. बिहारमधील सिवान येथून देखील एक अशीच घटना उघडकीस आली. इथे दोन बहिणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. दोन्ही मुलींनी एकमेकांना पती-पत्नी म्हणून लग्न देखील केले. ही बाब कुटुंबीयांना समजताच एकच खळबळ माजली. घरच्यांनी दोघींनाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण दोघीही आपल्या नात्यावर ठाम राहिल्या. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.
दरम्यान, दोन्ही मावस बहिणींनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी स्वत:च्या सुरक्षेची मागणी करणारा लेखी अर्ज राजधानी पाटणाच्या वरिष्ठ पोलिसांना दिला. अर्जात संबंधित बहिणींनी सांगितले की, खुर्शीद अहमद यांची मुलगी रोशनी खातून (२१) आणि तरवार पोलीस स्टेशन परिसरातील मंजूर आलम यांची मुलगी तराना खातून (१८) अशी आमची ओळख आहे. आम्ही मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत आहोत आणि ३१ ऑक्टोबर रोजी लग्न केले असून पती-पत्नी म्हणून एकमेकांना स्वीकारले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिला हवाला
पोलीस तक्रारीत मुलींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत समलैंगिक संबंधात राहणे गुन्हा नसल्याचे म्हटले. अशा जोडप्यांना समाजात राहण्याची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचे या बहिणींनी नमूद केले.
दोघीही बहिणी घरातून पळून पाटण्यात आल्या आणि तिथे एकत्र राहू लागल्या, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या नात्याबद्दल घरी समजल्यानंतर घरच्यांनी आक्षेप घेतला पण दोघीही समलिंगी विवाहावर ठाम होत्या. मुलींनी सांगितले की दोघी एकाच धर्माच्या आहेत आणि मग कुणाला काय हरकत आहे? दोघींनीही कुटुंबीयांवर समलिंगी विवाहाविरोधी असल्याचा आरोप केला आहे.