दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:57 AM2024-06-04T03:57:22+5:302024-06-04T03:58:22+5:30
दिल्लीतील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले.
नवी दिल्ली : दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणात ११०० कोटी रुपयांचे लाँड्रिंग झाले. त्यातील २९२.८ कोटी रुपयांच्या प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांचा हात असल्याचा दावा ईडीने यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या त्या कन्या आहेत.
दिल्लीतील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले.
के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या प्रकरणातील तीन आरोपी प्रिन्स, दामोदर, अरविंद सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या आरोपपत्रात म्हटले आहे की, आपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी काम करत असलेल्या विजय नायर या व्यक्तीच्या माध्यमातून त्या पक्षाला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात आली. या गुन्ह्यात के. कविता यांचा सहभाग आहे. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या गुन्ह्यातही त्या सामील होत्या.
८ आयफोन केले फॉरमॅट
बीआरएसच्या नेत्या के. कविता यांचे ८ आयफोन ईडीने ताब्यात घेतले होते, त्यात आयफोन १३ मिनी प्रकारातील २, आयफोन १३ प्रकारातील ४, आयफोन १४ प्रो प्रकारातील २ फोन होते. हे सगळे फोन फॉरमॅट करण्यात आले होते. या फोनमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणातील पुरावे आहेत. के. कविता यांना दिल्लीमधील पंचतारांकित हॉटेलात १० लाख रुपये भाडे असलेल्या रूममध्ये वास्तव्य केले होते, असा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.