'ड्राय स्टेट' गुजरातमध्ये भाजप नेता 'झिंगाट', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर द्यावा लागला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 09:12 PM2022-07-24T21:12:35+5:302022-07-24T21:13:52+5:30
भाजपशासित गुजरातमध्ये दारुबंदी आहे, पण भाजप नेताच दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले.
अहमदाबाद: गुजरातला ड्राय स्टेट म्हटले जाते, म्हणजेच राज्यात कुठेही दारू विकण्यास परवानगी नाही. पण, अवैधरित्या राज्यभर दारुची विक्री होत असते. यातच गुजरातच्या एका भाजप नेत्याचा कथितरित्या दारू पिऊन कार्यक्रमात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने प्रश्न उपस्थित केल्यावर भाजप नेत्याला राजीनामा द्यावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण छोटा उदयपूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष रश्मीकांत वसावा यांच्याशी संबंधित आहे. द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. द्रौपदी मुर्मू आदिवासी समुदायातून येतात आणि गुजरातचा हा भाग आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या कार्यक्रमाला भाजपच्या मंत्री निमिषा सुथारही उपस्थित होत्या. यावेळी रमाकांत वसावा दारुच्या नशेत कार्यक्रमात सामील झाले.
गुजरात में दारुबंधी की हकीकत बया करते हुई छोटा उदेयपुर के भाजपा जिला अध्यक्ष।
— Jagdish Thakor (@jagdishthakormp) July 24, 2022
क्या यही है भाकपा सरकार की दारूबंधी?
दारूबंधी सिर्फ कागजों पर मौजूद है क्योंकि यहां हर जगह दारू मिलती है।#Drink#Gujaratpic.twitter.com/lDWOExwFE8
काँग्रेस-आपचे टीकास्त्र
गुजरातमध्ये दारुबंदी आहे आणि अशातच छोटा उदयपूरच्या भाजप जिल्हाध्यक्षाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनीही रश्मीकांत वसावा यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत लिहिले- 'छोटा उदयपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष गुजरातमधील दारुबंदीचे वास्तव सांगत आहेत. ही भाजप सरकारची दारूबंदी आहे का? दारूबंदी फक्त कागदावरच अस्तित्वात आहे.'
वसावा यांचा राजीनामा
रमाकांत वसावा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्या राजीनाम्यात वसावा यांनी लिहिले आहे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी राजीनामा देण्यास सांगितले, त्यामुळे ते पक्षाचा राजीनामा देत आहेत. मात्र, या व्हिडिओनंतर गुजरातमधील दारुबंदीच्या वास्तवावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.