पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 06:18 PM2024-08-06T18:18:59+5:302024-08-06T18:43:54+5:30
India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत.
गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षापासून भारत आणि चीनमध्येलडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात कमालीच्या तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय लष्करामधील स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या न्योमा सॅपर्सने पूर्व लडाखमधील पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्युम पाइप पुलाचं बांधकाम केलं आहे. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. तसेच लष्कर आणि सामान्य नागरिकांना न्योमा आणि निडर या गावांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे.
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने मंगळवारी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पूर्व लडाखमधील न्योमा आणि निडर परिसरातील गावांदरम्यान नागरिक आणि लष्कराची ये जा सोपी व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाची पूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
#NyomaSappers bridging obstacles and building a new landscape.#NyomaSappers of Snow Leopard Brigade as part of Infra Development of Eastern Ladakh have constructed a Hume pipe bridge over Indus River. The bridge will significantly enhance connectivity and enable easy access… pic.twitter.com/8YHDxeO4oZ
— @firefurycorps_IA (@firefurycorps) August 6, 2024
एक मिनिट सात सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पुल बनवण्याच्या पूर्ण प्रकियेबरोबर लष्कराची काही अवजड वाहनं ही या पुलावरून जाताना दिसत आहेत. या माध्यमातून हा पुल किती भक्कम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न लष्कराने केला आहे. हे पूल बांधण्यासाठी लष्कराच्या इंजिनियर्सनी ह्यूम पाइपचा वापर केला आहे. त्यानंतर त्यावर मजबूत बांधकाम केलं आहे. तसेच या पुलाचं काम कमीत कमी वेळात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
यापूर्वी ३० जुलै रोजी लडाखमधील भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने ४०० मीटर लांब पुलाचं बांधकाम केल्याचं वृत्त आलं होतं. मात्र हा पुल चीनने १९५८ मध्ये बळकावलेल्या भागात बांधण्यात आला होता.