फेब्रुवारीतच सूर्य झाला ‘हॉट’, अंगाची लाही; २४ तासांत अनेक दशकांचा विक्रम मोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:12 AM2023-02-20T11:12:34+5:302023-02-20T11:12:45+5:30
शिमल्यात ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, हिमाचलमध्ये फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे.
नवी दिल्ली : इतके दिवस थंडीच्या लाटेने त्रस्त असलेल्या उत्तर भारतातच नव्हे तर देशभरात अनेक शहारांत फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चढला आहे. राजस्थान, चंडीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल, बिहार, छत्तीसगड येथून हिवाळा जवळजवळ गायब झाला आहे. या राज्यांमध्ये दिवसा कडक उष्ण आणि रात्री थंड होत आहेत.
हिमाचलमध्ये फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे. गेल्या २४ तासांत तापमानाने अनेक दशकांचा विक्रम मोडला आहे. पुढील तीन दिवस पश्चिमी हवामान बदल सक्रिय राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
राजस्थानमध्ये १२ वर्षांचा विक्रम मोडला
राजस्थानमध्ये यावेळी फेब्रुवारीमध्ये दिवसाचे कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ अंशांनी जास्त असून, अनेक शहरांमधील १२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा जूनपर्यंत कडक उष्मा राहील. उन्हाळ्यात तापमानावर नियंत्रण ठेवणारा तुरळक पाऊसही अपेक्षित आहे.