पाच वर्षांत तब्बल ९८ विद्यार्थ्यांनी देशभरात मृत्यूला केले जवळ; केंद्रीय शिक्षण संस्थांबाबत सरकारची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 06:07 AM2023-07-29T06:07:36+5:302023-07-29T06:08:02+5:30
करिअरची चिंता
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे, ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’, ‘आयआयएम’ , ‘आयआयएसईआर’मध्ये ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने संसदेत दिली.
२०१८ मध्ये या संस्थांतील २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये हा आकडा १९ होता. २०२० व २०२१ मध्ये तो खाली आला. २०२२ मध्ये ही संख्या पुन्हा वाढून २४ झाली, तर २०२३ मध्ये आतापर्यंत २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संसदेत दिली.
‘आयआयटी’त यंदा सात घटना
२०१८-२०१९ मध्ये ८ घटना घडल्या.
२०२०-२०२१ मध्ये त्या ३ व ४ पर्यंत खाली आल्या.
२०२२ मध्ये संख्या पुन्हा वाढून ९ झाली
२०२३ मध्ये आतापर्यंत ७ घटना समोर आल्या.
२०१८ साली केंद्रीय विद्यापीठांत आत्महत्येच्या ८ घटना
२०१९- २०२० मध्ये २ घटना घडल्या.
२०२१ मध्ये एकाही घटनेची नोंद नाही.
२०२२ मध्ये चार घटना घडल्या होत्या, तर यावर्षी आतापर्यंत नऊ घटना घडल्या आहेत.
आत्महत्येची कारणे काय?
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या अहवालानुसार आत्महत्येमागे व्यावसायिक/ करिअरच्या समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसाचार, कौटुंबिक समस्या व मानसिक विकार यासारखी विविध कारणे आहेत.
‘या’ विद्यार्थ्यांनी सोडले ‘आयआयटी’
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि इतर अल्पसंख्याक गटातील एकूण २५,५९३ आरक्षित वर्गातील विद्यार्थी पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून बाहेर पडल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिली.