मणिपूर हिंसाचाराबात धक्कादायक माहिती समोर, NIAने केला मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 04:10 PM2023-10-01T16:10:28+5:302023-10-01T16:10:46+5:30
Manipur violence: गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे एनआयएच्या तपासातून उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर आणि विरोधी जाती समुहांच्या सदस्यांवर हल्ला करण्यासाठी कार्यकर्त्यांचीही भरती करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो घरे जाळली जात आहेत. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. शेकडो लोक छावण्यांमध्ये जीव मुठीत धरून जगत आहेत. इंटरनेट सेवा बंद आहे. खूप प्रयत्नांनंतरही हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यादरम्यान NIAने मणिपूर हिंसाचाराबाबत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवागी समुहांनी वेगवेगळ्या जातीसमुहांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी आणि भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याच्या इराद्याने हिंसक घटनांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामध्ये उग्रवादी नेत्यांच्या वर्गासोबत एक कट रचला आहे. म्यानमार आणि बांगलादेशमधील उग्रवादी समूह कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता नांदू देण्यास इच्छूक नाही आहेत. आता एनआयएने चुराचांदपूर येथून एका संशयिताला अटक केली आहे. तो परकीय भूमीवरून भारताविरोधात करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.
म्यानमारमधील दहशतवादी संघटना बेकायदेशीरपणे हत्यारे, दारुगोळा आणि स्फोटके गोळा करतात. मणिपूरमधून झालेली शस्त्रास्त्रांची लूट हा त्यातीलच एक भाग आहे. भारत आणि म्यानमारदरम्यान १६४३ किमी लांबीची सीमा आहे. भारताच्या मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना मणिपूरची सीमा लागलेली आहे. त्यातील शेकडो किमी सीमा ही कुठल्याही कुंपणाविना मोकळी आहे. त्याशिवाय २०१८ मध्ये लागू करण्यात आलेल्या फ्री मुव्हमेंट रिजीममुळे म्यानमारमधील उग्रवाद्यांचा मार्ग सोपा केला आहे. या करारान्वये भारतातील चार राज्यांमध्ये राहणाऱ्या अनेक समुदायांचे लोक म्यानमारमध्ये १६ किमीपर्यंत आत जाऊ शकतात. त्यासाठी व्हिसा लागत नाही. याचाच उग्रवाद्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे.