भाजपाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षांसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 23:50 IST2025-02-27T23:48:20+5:302025-02-27T23:50:06+5:30
BJP News: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये गुरुवारी भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या बैठकीदरम्यान तुफान राडा झाला. या बैठकीदरम्यानच भाजपाचे पदाधिकारी एकमेकांशी भिडले. प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांचं स्वागत करण्यावरून वाद होऊन कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी एकमेकांना मारहाण केली.

भाजपाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षांसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये गुरुवारी भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या बैठकीदरम्यान तुफान राडा झाला. या बैठकीदरम्यानच भाजपाचे पदाधिकारी एकमेकांशी भिडले. प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांचं स्वागत करण्यावरून वाद होऊन कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी एकमेकांना मारहाण केली.
भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांचं अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रदेशाध्यक्षांसमोरच पदााधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनी मध्ये पडत वाद घालत असलेल्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले. तसेच समजूत घालून प्रकरण शांत केले. या दरम्यान भाजपाचे राजस्थानमधील प्रदेशाध्यक्ष मदन राठोड हेही मंचावर उपस्थित होते.
भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हमीद खान मेवाती यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये भाजपाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मदन राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते फरीदुद्दीन जॅकी हे मंचावर चढत होते. मात्र त्यांना अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री जावेद कुरेशी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून हा वाद झाला. अखेर प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी करून हा वाद थांबवला. त्यानंतर भाजपाने जावेद कुरेशी यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.