गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपा मुख्यमंत्री बदलणार नाही, पक्षनेतृत्वाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:07 PM2022-03-16T15:07:04+5:302022-03-16T15:07:42+5:30
BJP News: विद्यमान मुख्यमंत्र्यांसह इतर इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी केल्याने गोवा आणि मणिपूरमधील मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र गोवा आणि मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या संभ्रमाला भाजपाच्या पक्षनेतृत्वाने पूर्णविराम दिला आहे.
नवी दिल्ली - चार राज्यातील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान होणार हे निश्चित झाले होते. मात्र उत्तराखंडमध्ये विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पराभव झाल्याने मुख्यमंत्री कोण असेल याबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे. त्यातच विद्यमान मुख्यमंत्र्यांसह इतर इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी केल्याने गोवा आणि मणिपूरमधील मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र गोवा आणि मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या संभ्रमाला भाजपाच्या पक्षनेतृत्वाने पूर्णविराम दिला असून, दोन्ही राज्यांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता गोव्यामध्ये प्रमोद सावंत तर मणिपूरमध्ये बीरेन सिंह हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यामध्ये झालेल्या भेटीनंतर पंतप्रधानांनी सांगितले की, हल्लीच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या शानदार विजयासाठी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना शुभेच्छा. आमचा पक्ष मणिपूरच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्यातील भाजपाच्या नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणाले की, आमचा पक्ष गोव्यातील लोकांचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा राज्याची सेवा करण्याचा जनादेश दिला आहे. आम्ही येणाऱ्या काळात गोव्याच्या प्रगतीसाठी काम करू.
नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये चार राज्यांत भाजपाने बाजी मारली होती. त्यात ४० जागा असलेल्या गोव्यात भाजपाने २० जागा जिंकल्या. तर अपक्ष आणि मगोप मिळून ५ आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपाकडे २५ आमदारांचे निर्विवाद बहुमत झाले आहे. तर मणिपूरमध्ये भाजपाने ६० पैकी ३२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तसेच तिथे अन्य काही पक्षांचाही भाजपाला पाठिंबा मिळू शकतो.