चहाचा आग्रह पण असा? पती घरी आला नाही; पत्नीचा व्हिडीओ कॉल अन् टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 11:30 AM2024-02-04T11:30:16+5:302024-02-04T11:30:40+5:30
पती चहा पिण्यासाठी घरी न आल्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पती चहा पिण्यासाठी घरी न आल्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील या अनोख्या घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. येथे एका महिलेने पती चहा प्यायला घरी न आल्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पती घरी न आल्याने नाराज झालेल्या महिलेने त्याला व्हिडीओ कॉल करून गळफास घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वडोदरा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वृत्तसंस्था 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. २८ वर्षीय महिलेने तिच्या पतीला व्हिडीओ कॉल केला आणि कथितपणे गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
व्हिडीओ कॉल अन् टोकाचे पाऊल
महिलेचा पती शहरातील एका रुग्णालयात डॉक्टर आहे. तो चहा पिण्यासाठी घरी परतला नाही, असा आरोप आहे. यामुळे त्याची पत्नी नाराज होती अन् याच रागातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी या जोडप्याचे लग्न झाले होते. पतीच्या जबाबानुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेची स्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मागील वर्षी डिसेंबरमध्ये उत्तर प्रदेशात देखील अशीच एक घटना घडली होती. पण, इथे काहीसे वेगळे झाले होते. यूपीतील बागपत जिल्ह्यात एका महिलेने पतीने चहा मागितली म्हणून धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर पोलिसांच्या अटकेच्या भीतीने महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. महिलेच्या पतीने चहाचा कप मागितल्याने पत्नीला राग आला आणि तिने कात्री उचलून पतीच्या डोळ्यात वार केले होते.