हृदयद्रावक! प्रियकरासाठी पत्नीने केली लष्करातील जवानाची हत्या; काही दिवसातच होणार होता निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:56 PM2023-01-14T12:56:38+5:302023-01-14T12:57:19+5:30
पतीसोबत राहणे टाळण्यासाठी 2 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला.
नवी दिल्ली : आपल्या प्रियकराला मिळवण्यासाठी दोन मुलांची आई असलेल्या महिलेने आपल्या लष्करातील जवान पतीची हत्या केली आहे. खरं तर पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेतला. हत्येच्या या घटनेचा भ्रमनिरास करण्यासाठी आरोपी पत्नीने खोटे नाट्य रचून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता इतरांवर हत्येचा आरोप करणारी पत्नीच पतीच्या हत्येस जबाबदार ठरली.
दरम्यान, आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची ही घटना झारखंडमधील आहे. झारखंडमधील गुमला पोलीस स्टेशन हद्दीतील कोरा जामटोली गावात हा धक्कादायर प्रकार घडला. जामटोली गावातील रहिवासी लष्कर जवान पर्णा ओराव यांच्या हत्येची संपूर्ण कहाणी पोलिसांनी सांगितली आहे. लष्करातील जवानाची हत्या अन्य कोणीही नसून पत्नी बुद्धेश्वरी देवीसह तिच्या प्रियकराने केल्याचे उघड झाले आहे. लष्करी जवानाच्या हत्येप्रकरणी गुमला पोलिसांनी आरोपी पत्नी बुद्धेश्वरी देवी आणि खोरा जामटोली येथील रहिवासी विनय लकडा याला अटक केली आहे. या घटनेत वापरलेला लोखंडी रॉडही पोलिसांनी जप्त केला आहे.
प्रियकराच्या मदतीने केली हत्या
मृत लष्करी जवान पर्णा ओराव आणि त्यांच्या पत्नीमध्ये अवैध संबंधाच्या संशयावरून वाद व्हायचे असे सांगण्यात येत आहे. यावरून दोघेही एकमेकांशी नेहमी वाद घालत असत. पर्णा ओराव हे काही दिवसांनीच निवृत्त होणार होते आणि त्यांनी कुटुंबासोबत राहण्याची योजना देखील आखली होती. मात्र, त्यांची पत्नी बुद्धेश्वरी देवी आपल्या पतीला सोडण्याच्या तयारीत होती. पतीसोबत राहणे टाळण्यासाठी तिने प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला. 11 जानेवारीच्या रात्री तिने आपला प्रियकर 30 वर्षीय विनय लकडा याच्यासोबत मिळून ही हत्या केली.
पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक
पती-पत्नी दोघांमध्ये वाद झाल्याने बुद्धेश्वरी देवीने तिचा पती पर्णा ओराव कुमार यांच्यावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले व नंतर प्रियकराच्या मदतीने त्यांची हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर तिने गावकऱ्यांना व कुटुंबीयांना भलतेच कारण सांगितले. "अज्ञात गुन्हेगारांनी घरात येऊन धारदार शस्त्राने वार करून पतीची हत्या केली आणि बचाव करताना मला जखमी केले. त्यामुळे मी या घटनेपासून स्वत:चा बचाव केला आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पतीला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले", असे आरोपी पत्नीने सांगितले. पोलिसांनी अधिक तपास करून 36 वर्षीय पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पत्नी बुद्धेश्वरी देवीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येसाठी वापरलेला लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"