हरयाणात 'आप'चा झाडू चालला; झेडपीत भाजपची सफाई, केवळ २२ जागांवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:16 AM2022-11-29T06:16:35+5:302022-11-29T06:18:10+5:30
१०२ पैकी केवळ २२ जागांवर कमळ फुलले
हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हरयाणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव हा धक्कादायक ठरला आहे, कारण त्यांना १०२ जागांपैकी केवळ २२ जागा जिंकता आल्या आहेत. २२ जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या ४११ जागा होत्या. भाजपने केवळ १०२ जागा आपल्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला होता. या पक्षाने मात्र अपक्ष म्हणून १५१ जागा जिंकल्याचा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सहकारी जेजेपीने रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आणि भाजपला शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले. मात्र, रविवारी निकाल हाती आल्यानंतर भाजपची मोठी कोंडी झाली. जेजेपीसाठी धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी आयएनएलडीचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी ९८ जागांवर निवडणूक लढविली आणि १३ जागा जिंकल्या. दोन्ही पक्ष जाट मतांवर वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.
अपक्षांची सुरू झाली लगबग
n सर्वात आश्चर्यकारक घडामोडी म्हणजे, आपचा उदय. ११४ वॉर्डांमधून १४ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. हरयाणात आप बूस्टर डोसच्या शोधात असताना हे निकाल आले आहेत.
n काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या संख्येने त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाल्याचा दावा त्यांनी केला.
n भाजपने दोन महिन्यांपूर्वी ४६ नगरपालिकांत बहुमत मिळविले होते. पुढील महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रमुख पदे काबीज करण्यासाठी अपक्षांची लगबग सुरू झाली आहे.