भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 03:15 PM2024-05-09T15:15:24+5:302024-05-09T15:16:27+5:30
Lok Sabha Election 2024: भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंची लोकसंख्या घटल्याची आणि मु्स्लिमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. हा अहवाल प्रसिद्ध होताच भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.
भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंची लोकसंख्या घटल्याची आणि मु्स्लिमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार १९५० ते २०१५ या काळात भारतातीलहिंदूंची संख्या ७.८ टक्क्यांनी घटल्याचे तर मुस्लिमांची लोकसंख्या ४३ टक्क्यांनी वाढल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल प्रसिद्ध होताच भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये १९५० ते २०१५ या काळात ७.८ टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट भारताच्या शेजारील देशांमध्ये बहुसंख्याक समाजाच्या लोकसंख्येत वेगाने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने आपल्या अहवालामध्ये जगभरातील १६७ देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करून माहिती देण्यात आली आहे. मे २०२४ मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतात बहुसंख्याक हिंदूंची लोकसंख्येमधील हिस्सेदारी कमी झाली आहे. दुसरीकडे मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध आणि शीखांची इतर अल्पसंख्याकांची लोकसंख्येमधील भागिदारी वाढली आहे. मात्र जैन, पारशी धर्मांच्या लोकसंख्येत घट झाली आहे. १९५० ते २०१५ या काळात भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. तर ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत ५.३८ टक्के शिखांच्या संख्येत ६.५८ टक्के आणि बुद्धांच्या संख्येत किरकोळ वाढ दिसून आली.
दरम्यान, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशाची दिशाभूल करण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता. मात्र सत्य लपून राहत नाही. १९४७ मध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे ९० टक्के होती. मात्र आज ती ७० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. पूर्वी ८ टक्के असलेले मुस्लिम २० टक्के झालेली आहे. काँग्रेसने देशाला धर्मशाळा बनवले आहे. देशात बांगलादेशी घुसखोर आले आहेत. रोहिंग्या आले आहेत. आता हे मुस्लिमांना आरक्षण देण्याची तयारी करत आहेत. ते भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप गिरिराज सिंह यांनी केला.
भाजपाच्या आरोपांना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांच्या जीवनाशी संबंधित मुद्द्यांवर बोललं पाहिजे. बेरोजगारी, शेतकरी, महिलांची सुरक्षा या मुद्द्यांवर बोललं गेलं पाहिजे. भाजपावाले आपणच मुद्दे काढतात आणि बोलत राहतात, हे मुद्दे नाही आहेत, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला.