पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 19:15 IST2024-05-15T19:14:17+5:302024-05-15T19:15:22+5:30
पत्नी महामार्गावर ट्रक चालकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांची शिकार करायची.

पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
पती आणि पत्नीने मिळून पैसे उकळण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली. पत्नी महामार्गावरील ट्रक चालकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांची शिकार करायची. राजस्थानमधील जयपूर येथील या घटनेने एकच खळबळ माजली. अखेर संबंधित पती आणि पत्नीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी पती नूर आलम आणि त्याची पत्नी रूबीना बानो कट रचून पैसे उकळायचे. हे दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी असून, जयपूरमध्ये भाड्याच्या घरात राहतात.
घरापासून दूर केटीएमसारख्या महागड्या गाडीचा वापर करत हे जोडपे ट्रक चालकांची फसवणूक करत असत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी एक ट्रक चालक जयपूरहून गुजरातला जात होता. वाटेत तो अजमेर-दिल्ली महामार्गावर ट्रकची काच साफ करण्यासाठी थांबला असता एक महिला त्याच्याकडे आली आणि त्याला जाळ्यात फसवू लागली. तिने त्याच्याशी काही वेळ चर्चा करून त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मग तिने तिच्या पतीला तिथे बोलावून संबंधित ट्रक चालकाला धमकावले. पती-पत्नीने मिळून ट्रक चालकाकडून ३० हजार रूपये घेतले आणि तिथून पळ काढला. ट्रक चालकाने पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी वाहनाच्या नंबर प्लेटच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
माहितीनुसार, पती-पत्नी नियोजन करून त्यांना कोणी ओळखू नये म्हणून घरापासून दूर जात... मग महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची फसवणूक करत. रोडवर जी वाहने थांबली असतील त्यांच्या चालकांशी संबंधित महिला बोलत असे. मग ट्रक चालक आपल्या जाळ्यात फसल्याचे लक्षात येताच ती त्याला धमकावून पैशांची मागणी करते. संबंधित चालक त्रास देत असल्याचा आरोप करून तिने अनेकांकडून पैसे उकळले आहेत. बदनामी होईल या भीतीमुळे बहुतांश चालक पोलिसांत तक्रार करत नव्हते. याचाच फायदा आरोपींना झाला आणि त्यांना या कार्यात बळ मिळत गेले. अखेर आरोपींनी चुकीची कबुली देत सर्व प्रकार सांगितला.